Nuh Violence : नूंह हिंसेविरोधात विश्व हिंदू परिषदेचे दिल्लीत आंदोलन

Nuh Violence : नूंह हिंसेविरोधात विश्व हिंदू परिषदेचे दिल्लीत आंदोलन
Published on
Updated on

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हरियाणातील नूंह येथे हिंदुंना लक्ष्य करीत घडविण्यात आलेल्या हिंसाचाराच्या विरोधात विश्व हिंदू परिषदेने दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात बुधवारी निदर्शने केली. या आंदोलनाला बजरंग दलाने पाठिंबा दिला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

दिल्लीसह गुरुग्राम, गाझियाबाद, साहिबाबाद, नोएडा, फरिदाबाद आदी ठिकाणी तीव्र आंदोलन करण्यात आले. नोएडा येथे सेक्टर २१ ए पासून रजनीगंधा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यात हजारो लोक सामील झाले होते. साहिबाबाद येथे विहिंप आणि हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांनी इंदिरापूरम सीआयएसएफ मार्ग रोखून घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे कनावली येथे एका पुतळ्याचे दहन करण्यात आले. मानेसार येथे कसान मार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता.

गाझियाबादमध्ये नवयुग बाजारात विशाल मार्च काढण्यात आला. तर दिल्लीत विकास मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता.
नूंह हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर गुरुग्राम, फरीदाबाद, पलवल, वल्लभगड येथे तणावाचे वातावरण आहे. वल्लभगड मध्ये काही लोकांनी रघुवीर कॉलनी तसेच तिरखा कॉलनीतील एका धार्मिक स्थळाचे दरवाजे तोडून टाकले. तर मंझावली येथे लाऊड स्पीकर तोडून टाकण्यात आला. विहिंपचे आंदोलन लक्षात घेऊन राजधानी दिल्लीत संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली होती. ठिकठिकाणी बॅरेकेडिंग करुन वाहनांची तपासणी केली जात होती.

नूंह हिंसाचारात सहा लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन होमगार्ड जवानांचा समावेश आहे. आतापर्यंत ११६ दंगलखोरांना अटक करण्यात आली असून काही दंगलखोर अरावलीच्या जंगलात लपून बसले असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news