![Rahul Narwekar](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2024%2F02%2F%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%B0.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई : पुढारी वृत्तसेवा : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील 10 आमदारांना अपात्र न ठरवण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकेची दखल घेत उच्च न्यायालयाने बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांच्यासह शरद पवार गटाचे जयंत पाटील, अनिल देशमुखांसह 10 आमदारांना नोटीस बजावली. या सर्वांना 11 मार्चपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपीठाने याचिकेची सुनावणी 14 मार्चला निश्चित केली.
संबंधित बातम्या
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाचा, याचा निवाडा करताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul Narwekar ) यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले. या निर्णयाला अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.
या याचिकेवर बुधवारी न्या. कुलकर्णी व न्या. पुनीवाला यांच्या खंडपीठापुढे बुधवारी प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. मुकुल रोहतगी यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला जोरदार आक्षेप घेतला. तसेच विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी पक्षाची घटना, रचना व विधिमंडळातील संख्याबळ या त्रिसूत्रीच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरतो, असे सांगत पक्षातील वाद फूट नसल्याने दहाव्या परिशिष्टानुसार आमदारांवर अपात्रतेची कारवाई करता येणार नाही, असे म्हटले होते.
यावेळी त्यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवल्याकडे अॅड. रोहतगी यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. तसेच त्यांनी अध्यक्षांचा निर्णय बेकायदेशीर असून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दहा आमदारांना अपात्र घोषित करा अशी विनंती केली होती.