चांडोलीत लाळ-खुरकुताने 12 गायी, 2 बैलांचा मृत्यू : शेतकरी हतबल | पुढारी

चांडोलीत लाळ-खुरकुताने 12 गायी, 2 बैलांचा मृत्यू : शेतकरी हतबल

मंचर : पुढारी वृत्तसेवा : चांडोली बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे लाळ-खुरकुत संसर्गजन्य रोगामुळे गेल्या 8 दिवसांत 12 दुभत्या गायी व 2 बैलांचा मृत्यू झाला, तर 20 जनावरांवर उपचार सुरू आहेत. आधीच पाणी, चाराटंचाई, महागाई, पिकांचे पडलेले बाजारभाव पशुधनाच्या मृत्यूमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. चांडोली बुद्रुक येथील अनिल थोरात यांनी बाजारातून नुकताच एक बैल खरेदी केला होता. या बैलाचा लाळ-खुरकुत संसर्गजन्य रोगाने पहिल्यांदा मृत्यू झाला. त्यानंतर गोठ्यातील गायीचा मृत्यू झाला. संतोष काळे यांच्या गोठ्यातील 4 दुभत्या गायी व एक बैल, बाबाजी काळे यांची एक गाय, मारुती कोकणे यांच्या दोन कालवडी, रामदास थोरात, बाळशिराम थोरात, अनिल थोरात व ज्ञानेश्वर थोरात यांच्याही प्रत्येकी एका गायीचा मृत्यू झाला.

गावातील एकूण 14 जनावरे दगावली असून, 20 जनावरांवर उपचार सुरू आहेत. महसूल विभागाने त्वरित पंचनामे करून संबंधित शेतकर्‍यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पशुपालकांचे शिष्टमंडळ भेटणार आहे. याबाबतची माहिती मिळताच तालुका पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुधन विकास अधिकारी डॉ. अजय कोल्हे, डॉ. अभिजित परांडेकर, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. अरुण महाकाळ व डॉ. वसंत वाळूंज आदींनी गावात दाखल होत तत्काळ जनावरांचे सर्वेक्षण व उपचार सुरू केले आहेत. पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. जयंत माओरे, पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत साळवे व डॉ. मिलिंद देंडगे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या वेळी सरपंच दत्ता केदार, बाजार समितीचे संचालक संदीप थोरात, ग्रामपंचायत सदस्य गोविंद थोरात, ज्ञानेश्वर थोरात, अतुल थोरात, पोपटराव थोरात, नीलेश थोरात आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button