North Maharashtra Cold : उत्तर महाराष्ट्रात निफाड सर्वाधिक थंड, जळगावचा पारा ९.६ अंशांवर

North Maharashtra Cold :  उत्तर महाराष्ट्रात निफाड सर्वाधिक थंड, जळगावचा पारा ९.६ अंशांवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवत आहे. विभागात मंगळवारी (दि.२३) सर्वात नीचांकी ६.२ अंश तापमानाची नोंद निफाडला झाली आहे. पाऱ्यातील घसरणीमुळे निफाडवासीयांना हुडहुडी भरली आहे. दुसरीकडे जळगावला ९.६ तर नाशिकमध्ये १०.१ अंश सेल्सियस तापमान नोंदविण्यात आले.  (North Maharashtra Cold)

हिमालयातील बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतामधील बहुतांश राज्यांमध्ये पाऱ्यात लक्षणीय घसरण झाली आहे. त्यामुळे उत्तर भारतीय गारठून गेले असताना महाराष्ट्राच्या हवामानावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. तीन दिवसांपासून मध्य भारतामधील कोरड्याठाक हवामानामुळे वेगाने प्रवाही थंड वारे राज्यात धडकत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात त्यातही विशेष करून उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर अधिक जाणवत आहे. द्राक्षपंढरी असलेल्या निफाडला यंदाच्या हंगामातील सर्वात नीचांकी ६.४ अंश तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे अवघ्या तालुक्यात थंडीची लाट पसरली आहे. त्यात पहाटे पडणाऱ्या दवबिंदूमुळे द्राक्षबागांना धोका वाढल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. (North Maharashtra Cold)

विभागात निफाडनंतर जळगाव सर्वाधिक थंड आहे. जिल्ह्यात पारा १० अंशांखाली आल्याने तेथील शहरवासीय गारठले आहे. थंडीपासून बचावासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटविण्यासह नागरिक दिवसभर उबदार कपडे परिधान करत आहेत. याशिवाय नाशिकचा किमान तापमानाचा पारा १०.१ अंशांपर्यंत खाली आहे. घसरलेल्या तापमानामुळे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले आहे. उर्वरित अन्य जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. गहू-हरभऱ्यासाठी हे हवामान पोषक असले तरी अन्य पिकांसाठी ते धोकेदायक असल्याने बळीराजा चिंतातुर झाला. विभागात धुळे १२ व नंदुरबारला १३ अंश तापमानाची नोंद झाली. दरम्यान, उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींची लाट कायम राहणार असल्याने उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका अधिक वाढण्याची शक्यता आहे.

किमान तापमान (अंश सेल्सियस) (North Maharashtra Cold)

निफाड ६.२

जळगाव ९.६

नाशिक १०.१

मालेगाव ११.६

धुळे १२.०

नंदुरबार १३.०

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news