ना. धों. महानोर : रानगंध पेरणारा प्रतिभावंत…

ना. धों. महानोर
ना. धों. महानोर
Published on
Updated on

मराठी कवितेवर अविचल निष्ठा ठेवत; शेतीशी कायम जोडून घेत, प्रीती आणि निसर्ग यांचे विश्व लेखनीतून अमर करणारे ना. धों. महानोर साठोत्तरी कालखंडातील जनमान्य कवी. त्यांनी शेतीविषयक लेखन केले. व्यक्तीचित्रे रेखाटली. छत्रपती शिवरायांचे काव्य लिहिले. गांधारीसारखी कादंबरी लिहिली मात्र, मराठी गाणी आणि कविता या दोन क्षेत्रांत महानोरांचा दबदबा श्रेष्ठ राहिला. त्यांची कविता आणि गाणी जनामनांच्या ओठांवर कायम खिळून राहिली. मराठी कवितेत स्वतंत्र शब्दविश्व, खास प्रतिमांची भाषा आणि येथील लोकपरंपरेतील रूपकं यांचे खास असे दालनच या प्रतिभावंत ज्येष्ठ अशा कवीने उघडले. मनांत घर करणारी त्यांच्या कवितेची लय, निसर्गाचे संपूर्ण मनोहारी दर्शन घडवणारी शब्दकळा, माणसांच्या दुःखजाणिवांना भिडणारी खास शब्दकळा आणि कवितोला लगडून असणारा मातीचा अस्सल गंध हा असा जो इतिहास महानोरांनी रचला. त्यात महानोर म्हणजे एकमेव….

वस्तुतः अजिंठा सारखे रसरशीत दीर्घकाव्य किंवा अकादमीने सन्मानीत केलेली 'पानझड' मधली कविता किंवा ग्रामीण स्त्रीजीवनाचा श्रमपट थेट मांडणारी 'तिची कहाणी' मधली कविता किंवा 'प्रार्थना दयाघना' मधील शेतशिवार शेतकरी – श्रमकरी यांचा अवकाश स्वीकारणारी दीर्घकविता : हे सगळे त्यांचे लेखन अक्षर ठरलेले लेखन आहे. " रानातल्या कविता" हा त्यांचा संग्रहच्या संग्रह तोंडपाठ असणारी कितीतरी माणसं देशो- देशी भेटतात. याप्रमाणेच, महानोरांच्या गाण्यांचेही गारुड असेच उदा. दोघी, विहीर, जैत रे जैत, एक होता विदुषक यासारख्या मराठी चित्रपटातील त्यांची गाणी कायम माणसांच्या ओठी खिळून असतात. चित्रपटांच्या गाण्यांना प्रतिष्ठा आणि गुणवत्ता मिळवून देणारे महानोर हे कदाचित एवढे मोठे एकमेव कवी म्हणायला हवेत !

अस्सल आणि अभिजात जे-जे, ते महानोरांठायी होते. लोकजीवन आणि लोकवाङ्मय यांचा व्यासंग आणि त्यातील अनुभव महानोरांचा विलक्षण. त्यातूनच लय, गंध, शब्द, शैली, रस, रूप त्यांच्या एकंदर कवितेत काठोकाठ भरून राहिले. कमी शब्दांतली काव्यरचनाही त्यांनी केली; जी चित्त वेधून घेते. मन गुंतवून टाकते. लोकसंगीताचे त्यांचे ज्ञान प्रचंड होते. स्वर, ताल, लय, नाद, शब्द यांचा मोठा त्यांचा विशेष व्यासंग होता. त्यामुळे, कोणत्याही काव्यमैफलीत हातातल्या वहीवर ते छान ताल धरून जेव्हा, कविता म्हणत तेव्हा रसिकांचा सगळा मंडपच जणू महानोरांच्या तालसूरांत डुबून जायचा." कवितेत राज्य निर्मिणारा राजा कवी "असं त्यांचं यथोर्थ वर्णन करणं म्हणूनच मौलिक ! यशवंतराव चव्हाण, लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर, जब्बार पटेल, शरद पवार यांच्याशी अत्यंत हार्दिक ऋणानुबंध असलेला महानोरांनी साहित्य, समाजकारण, सिनेमा, कला, संगीत, नाटक, कृषी विद्यापीठं या क्षेत्रांशी दिलेले योगदान कधीही न विसरता येणारे असेच.

कविवर्य ना. धों महानोरांचा लोकसंग्रह अफाट होता. प्रत्यक्ष आपले जीवन त्यांचे चारित्र्यसंपन्न होते. शुभ्र साध्या वेषभूषेत त्यांची साधी रहाणी "आदराचे आभाळ पुढ्यात ठेवणारी होती. सहज बोलतानाही आपण भिजलेला शब्द एकतो, असा ऐकणाऱ्यास अनुभव येई. सारांश, "बोले तैसा चाले " हे त्यांच्या स्वभावाचे गमकच होते व महानोरांच्या तेजस्वी डोळ्यांतले तेज त्यांना पहाताच लक्षात येईच. उंच भाव प्रदेश आणि सततची हसरी प्रसन्न मुद्रा : असे त्यांचे रूप पहाताना, पहाणारी आनंदून जायचा. "दादा" ही त्यांची साहित्य मांदियाळीतली आत्मिय ओळख होती आणि दादांचे " पाठांतर स्मरण" स्तिमीत करणारे असेच. ते बोलताना, ते मैफलीत कविता गाताना, भाषण करताना, मैफलीत रंगून जाताना ना. धों महानोरांच्या विलक्षण प्रतिभेचा अनुभव हा यायचा म्हणजे यायचाच. सर्व प्रवाहीच्या साहित्यिकांच्या सर्व पिढ्यांशी सौहार्दाचे आणि कळवळ्यांचे त्यांनी निर्मिलेले नाते प्रचंड असेच होते !

या थोर कवींचा अवघा काळा हा तेजोमय आणि संपन्न काळ राहिला. कमी नव्हे जवळजवळ ६० वर्षांपेक्षा अधिक मोठा काळ कविता म्हणजे महानोर आणि महानोर म्हणजे कविता" असाच राहिला. आणि हे याप्रकारचे गारुड पुढेही कायम राहिल, इतके रसरशीत असे प्रतिभेचे देणे लाभलेला हा कवी. निसर्गतः काही वर्षांपासून अगदीच ते थकले होते. वयोमानाचा भाग. तरीही, भेटी होत असत. फोनवरही बोलणेरी होई. माय, महानोरांची कविता ही कायम जनतेसोबत असेल. त्यांची गाणी रसिकांचे आनंदी जगणे अधिक आल्हाददायक करत रहातील.

प्रतिभावंत म्हणजे, माणसं जपणारा, माणसं जोडणारा, शब्दांशी इमान बांधून जगणारा, शेती – माणूस-पक्षी-पाखरू -झाड- निसर्ग-फळ- रान-सृष्टी पाऊस-पाणी- दुष्काळ – पानझङ माय, माऊली यांच्याशी सतत, शेवटपर्यंत जोडून असणारे महानोर त्यांच्या समृद्ध साहित्यसंपदेमधून निरंतर वाचक- रसिक जनते समवेत असतील ! अशा थोर प्रतिभावंतास विनम्र आदरांजली

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news