महायुतीला बिनशर्त पाठिंबा नाही: रामदास आठवले

रामदास आठवले
रामदास आठवले
पुणे: पुढारी वृत्तसेवा : देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान दिले आहे. लोकशाही धोक्यात असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, ज्याला आंबेडकरांचे संविधान मान्य असेल त्यांनीच देशात रहावे. संविधान बदलले जाणार नाही, अशी ठाम भुमिका केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत घेतली.
आपला देश संविधानानुसार चालतो. हे जर कुणाला मान्य नसेल, संविधान मान्य नसेल तर चलेजावचा नारा आम्ही देणार आहोत. मी 17 राज्यांचा दौरा केला आहे. देशात वातावरण आमच्या बाजूने आहे. तामिळनाडूतही एनडीएच्या जागा येतील. तसंच उत्तर भारतातही जागा जिंकून येतील. आम्ही दिलेल्या नार्‍याप्रमाणे 400 जागा जिंकू, जनतेचा आम्हाला कौल आहे असेही रामदास आठवले यांनी यावेळी सांगितले.
पुण्यातल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांचा उल्लेख अतृप्त आत्मा असा केला होता. त्यांनी शरद पवारांचं नाव न घेता त्यांच्यावर ही टीका केली होती. ज्यानंतर त्यांना त्याच शब्दांमध्ये उत्तर देण्यात आलं. महाराष्ट्रात एक वखवखलेला आत्माही फिरतो आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता या सगळ्या प्रकरणी रामदास आठवलेंनी एक कविता केली आहे. "नरेंद्र मोदींचा भटकत आहे, महाराष्ट्रात आत्मा… कारण आम्हाला महाविकास आघाडीचा करायचा आहे खात्मा…"

… त्यांचे सरकले आहे डोके

नरेंद्र मोदींचा वखवखलेला आत्मा भटकत आहे. असं संजय राऊत आणि उद्धव ठाकरे म्हणतात. त्यांना उद्धव ठाकरे यांनी केवळ आरोप करण्यासाठी ठेवले आहे. राज्याचा खेळ खंडोबा यांनी केला आहे. "जे रोज म्हणत आहेत खोके-खोके, त्यांचे सरकले आहे डोके…" असं म्हणत आठवलेंनी राऊतांच्या टीकेलाही आठवलेंनी कविता करीत उत्तर दिले आहे.

बिनशर्त पाठिंबा नाही…

मी सध्या राज्यसभेवर आहे. आम्हाला एक जागा मिळणे अपेक्षित होते. महायुतीच्या नेत्यांनी प्रयत्न केले असते तर नक्कीच मिळाली असती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमध्ये एक कॅबिनेट, विधानसभेला सात ते आठ जागा, जिल्हा नियोजन समितीवर सदस्य तसेच महामंडळामध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांना घेण्याचे आश्वासन दिले आहे. या सर्व अटी-शर्तीवरच त्यांना पाठिंबा दिला असून बिनशर्त पाठिंबा दिलेला नसल्याचा केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

बारामतीचा आम्हीच गड जिंकू

बारामती लोकसभा मतदारंसघामध्ये पवार विरुध्द पवार अशी लढत होणे अपेक्षित नव्हते. तरीही अजित पवारांची ताकद मोठी असून तेथे आम्हीच गड जिंकू. पुणे जिल्ह्यातील चारही आणि मुंबईत सहा जागा महायुतीच जिंकेल, असा आत्मविश्वास रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केला.
हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news