माले : पुढारी ऑनलाईन; मालदीवची राजधानी माले येथे एका इमारतीला लागलेल्या भीषण आगीत (Maldives fire) १० कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये ९ भारतीयांचा समावेश असून अनेकजण जखमी झाल्याचे वृत्त एएफपी वृत्तसंस्थेने दिले आहे. एका सुरक्षा अधिकाऱ्याने पुष्टी केली की मृतांमध्ये नऊ भारतीय आणि एका बांगलादेशी नागरिकांचा समावेश आहे.
राजधानी माले येथे गुरुवारी एका इमारतीला आग लागली. आगीत नष्ट झालेल्या इमारतीच्या वरच्या मजल्यावरून एकूण १० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इमारतीच्या तळमजल्यावर वाहन दुरुस्तीचे गॅरेज आहे. या गॅरेजमध्ये लागलेली आग इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहोचली. या इमारतीत स्थलांतरित कामगार दाटीवाटीने वास्तव्यास होते.
"घटनास्थळी १० मृतदेह सापडले आहेत," असे अग्निशमन सेवेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना सुमारे चार तास लागले. मालदीवमधील भारतीय उच्चायुक्तालयाने या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. भारतीय उच्चायुक्तालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, "मालेतील आगीत भारतीयांसह इतरांच्या झालेल्या जीवितहानीमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे. आम्ही मालदीव अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहोत." दरम्यान, मालदीवच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले की, जवळच स्टेडियममध्ये निवारा केंद्र उभारण्यात आले आहे.
मालदीवमध्ये असलेल्या एकूण अडीच लाख परदेशी पुरुष कामगारांमध्ये निम्मे कामगार हे बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथील आहेत. कोरोना काळात येथील परदेशी कामगारांच्या राहणीमानाची बिकट परिस्थिती समोर आली होती. मालदीव हे जगातील सर्वात दाट लोकवस्ती असलेल्या शहरांपैकी एक आहे. परदेशी कामगार ज्या परिस्थितीत रहात आहेत त्यावरुन मालदीवमधील राजकीय नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. (Maldives fire)
हे ही वाचा :