सिद्धू मूसेवाला हत्येप्रकरणी ‘टेरर गँग्ज’वर कारवाई, NIA ची ६० ठिकाणी छापेमारी

सिद्धू मूसेवाला
सिद्धू मूसेवाला

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Punjabi singer Sidhu Moose Wala) याच्या हत्येशी संबंधित संशयित 'टेरर गँग्ज' (terror gangs) विरोधात राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) सोमवारी दिल्ली, दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि पंजाबमधील ६० ठिकाणी छापेमारी केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ही कारवाई एनआयने स्थानिक पोलिस दलांच्या समन्वयाने केली आहे. काही दहशतवादी टोळ्यांविरुद्ध अलीकडील काही दिवसांत गुन्हे नोंद झाले आहेत. त्यांचा तपास करण्याच्या अनुषंगाने एनआयने (NIA) छापेमारी सुरु केली आहे.

"काही दहशतवादी टोळ्यांविरुद्ध नुकत्याच नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या तपासासाठी दिल्ली, एनसीआर, पंजाब आणि हरियाणामधील अनेक ठिकाणी छापे टाकले जात आहेत," असे एका उच्च सरकारी सूत्राने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले आहे.
ज्या टोळ्यांचे सिद्धू मूसेवाला याच्या हत्येशी संबंध आहे, त्या टोळ्यांविरोधात कारवाई सुरु केली आहे, असेही अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पंजाबच्या मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी अज्ञात हल्लेखोरांनी मूसेवाला याची गोळ्या झाडून हत्या केली होती. मूसेवाला हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई हा मास्टरमाईंड आहे. बिश्नोई सध्या तिहार तुरुंगात आहेत. तर कॅनडा येथील गुंड गोल्डी ब्रार हा बिश्नोईचा जवळचा सहकारी आहे. या प्रकरणात तो इतर गुंडांसह एनआयएच्या रडारवर आहे.

पंजाब विधानसभा निवडणुकीत मूसेवाला याने काँग्रेसच्या तिकीटावर मानसा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्याचा आपचे विजय सिंग यांनी पराभव केला होता. २८ वर्षीय मूसेवाला याच्यावर मानसा जिल्ह्यातील जवाहरके गावात पॉईंट-ब्लँक रेंजवर गोळ्या झाडल्या होत्या आणि मानसा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याला मृत घोषित करण्यात आले होते. त्याच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिसांनी जूनमध्ये दोन शूटर्ससह तिघांना अटक केली होती. प्रियव्रत उर्फ फौजी (२६, हरियाणातील सोनीपतचा रहिवासी), कशिश (२४, झज्जर जिल्ह्यातील रहिवासी) आणि केशव कुमार (२९, पंजाबमधील भटिंडा येथे राहणारा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी सांगितले की प्रियव्रत हा शूटर्सच्या एका गँगचा लीडर होता आणि या घटनेच्या वेळी तो ब्रारच्या थेट संपर्कात होता. पंजाब पोलिसांनी याआधी म्हटले होते की या प्रकरणी मुख्य सूत्रधार लॉरेन्स बिश्नोईसह १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news