छोटा शकीलसह अन्य तिघांवर टेरर फंडिंगचा गुन्हा
नवी दिल्ली/मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए)आंतरराष्ट्रीय दहशतवादी, कुख्यात पळपुटा डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचा पंटर छोटा शकील तसेच 'डी' कंपनीतील आणखी तीनजणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले. 'यूएपीए', 'मोका'सह 'भादंवि'च्या विविध कलमान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. 'डी' कंपनी भीती दाखवून लोकांकडून खंडण्या उकळून, या पैशांचा वापर मुंबई तसेच परिसरात दहशतवादी कृत्यांसाठी करत असल्याचेनिष्पन्न झाल्याचे 'एनआयए'ने शनिवारी स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित केलेला दाऊद इब्राहिम, त्याचा हस्तक छोटा शकील (दोन्ही सध्या पाकिस्तानच्या आश्रयाला आहेत) वगळता आरिफ अबूबकर शेख ऊर्फ आरिफ भाईजान, शब्बीर अबूबकर शेख, मोहम्मद सलीम ऊर्फ सलीम फ्रूट या तिघांना 'एनआयए'ने अटक केली आहे. तिन्ही आरोपी हे 'डी' कंपनीचे सदस्य असून, दहशतवादी टोळीचा एक भाग आहेत.
या टोळीने अनेक कटकारस्थाने रचलेली आहेत. ती पूर्ण करण्यासाठी, अशांतता माजविण्यासाठी हे सारे पैसा उभारत आहेत. लोकांना धमक्या देऊन खंडण्या गोळा करत आहेत. प्रचंड प्रमाणात या गुंडांनी पैसा उभा केला आहे. ताज्या गुन्ह्यात काहींना ठार मारण्याची धमकी या गुंडांनी दिली आहे. भारताच्या सुरक्षिततेला धोका पोहोचविण्याचा त्यांचा इरादा आहे. सामान्य लोकांमध्ये आपली प्रचंड दहशत असावी, या प्रकारचे या टोळीचे मनसुबे आहेत. अटकेतील आरोपींनी परदेशात असलेल्या आरोपींकडून, गुन्हेगारांकडून हवालामार्गे मोठ्या रकमा स्वीकारल्याचे गुन्ह्याच्या आतापर्यंतच्या तपासातून निष्पन्न झाले आहे, असेही 'एनआयए'ने स्पष्ट केले. फेब्रुवारीत हा गुन्हा दाखल झाला होता.
दाऊद इब्राहिम टोळीच्या मदतीने देशातील आघाडीच्या राजकीय नेत्यांना संपविण्याचा कट 'आयएसआय' (पाकची गुप्तचर यंत्रणा),
लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांनी रचल्याचे उघडकीला आले होते. देशातील विविध शहरांतून मोठे घातपात रचण्याचा दहशतवादी कटही उघड झाला होता. तब्बल 29 ठिकाणांवर 'एनआयए'ने छापे टाकले होते. हाजी अली, माहीम दर्ग्याचा सुहैल खंडवानी, समीर हिंगोरा, छोटा शकीलचा मेहुणा सलीम कुरैशी, दाऊदचा नातेवाईक गुड्डू पठाण, भिवंडीचा कय्युम शेख यांच्या विरोधातही चालू वर्षातील मे महिन्यात 'एनआयए'ने कारवाई केली होती.
दाऊदच्या शिरावर अडीच कोटी डॉलरचे 'इनाम'
हाफीज सईद, मौलाना मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन, अब्दुल रऊफ असगर यांच्यासह दाऊद हाही भारताचा 'मोस्ट वाँटेड' आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये केंद्रीय दहशतवादविरोधी संस्थेने मुंबई बॉम्बस्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमवर 25 लाख रुपयांचे
बक्षीस ठेवले आहे. युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलने 2003 पासून दाऊदच्या डोक्यावर 25 दशलक्ष डॉलरचे (अडीच कोटी डॉलर) बक्षीस ठेवले आहे.
हे ही वाचा :