होय, आम्ही बेईमान ठाकरेंचा सूड घेतला; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खळबळजनक विधान | पुढारी

होय, आम्ही बेईमान ठाकरेंचा सूड घेतला; उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे खळबळजनक विधान

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : उद्धव ठाकरे यांनी माझ्या आणि भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला, आमच्याशी बेईमानी केली, त्याचा बदला घेण्याची संधी आम्ही शोधत होतो आणि योग्य वेळ येताच आम्ही सूड घेतला, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी करून खळबळ उडवून दिली.

‘इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह’मध्ये फडणवीस यांची मुलाखत झाली. राज्यातील सत्तांतरावर बोलताना फडणवीस म्हणाले, आम्ही राजकीय नेते आहोत. आम्ही काही तपस्या करायला येथे आलेलो नाही. आम्ही काही साधू-संत नाही, त्यामुळे जर ते आमच्याशी बेईमानी करत असतील, तर त्याचा जवाब आम्ही देणारच. आम्हीही उद्धव ठाकरे यांना उत्तर दिले. भाजप आणि शिवसेनेने एकत्र निवडणूक लढविली. मी मुख्यमंत्री होणार, हेही ठरले; पण विधानसभा निवडणुकीनंतर नंबर असे आले की, आता भाजपचा गेम करता येईल, असे त्यांचे ठरले. आमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यामुळे मीसुद्धा त्याचा सूड घेतला, या पुनरुच्चार फडणवीस यांनी केला.

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना दिला होता आणि तो त्यांनी मान्य केला, असा दावा करून फडणवीस म्हणाले, सरकार आणण्यासाठी काही तडजोडी कराव्या लागतात. त्या आम्ही केल्या. माझे आणि शिंदेंचे पहिल्यापासून चांगले संबंध आहेत. मी उपमुख्यमंत्री आहे म्हणून मला दुय्यम वागणूक त्यांनी दिली नाही, आम्ही विचारविनिमय करून सरकार चालवत आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. अडीच वर्षांत आघाडी सरकार आपण बघितले. सर्वच आघाड्यांवर राज्य मागे गेले. त्यामुळे बदल गरजेचा होता, असे त्यांनी नमूद केले. शिंदे गटात आलेल्या आमदारांवर आरोप आहेत, या प्रश्नावर ते म्हणाले, महापालिका कोणाच्या इशार्‍यावर चालत होती. मुख्य फायदा कुठे जात होता. त्यामुळे बाकी सगळे प्यादे होते, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या
Back to top button