अमृतसर, वृत्तसंस्था : पंजाबातील अमृतसर येथे शुक्रवारी शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्या प्रकरणात आता कॅनडातील खलिस्तानी दहशतवादी लखबीरसिंग लंडा याची एंट्री झाली आहे. पळपुटा लखबीर याने 'सोशल मीडिया'वरून सुरी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. लखबीरसिंग बर्याच दिवसांपासून सुरी यांच्या हत्येचा कट रचत होता. काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या त्याच्या हस्तकांनी पोलिसांना ही माहिती दिली होती.
लखबीरसिंग लंडा हा तरणतारणचा मूळ रहिवासी आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटलेय की, ही तर सुरुवात आहे. जो कुणी शीख जाती आणि अन्य धर्मांच्या बाबतीत वाईटसाईट बोलतील, त्यांचेही नंबर लागत राहतील. पोलिस सुरक्षा मिळाली म्हणजे आपण बिनधास्त आहोत, असे कुणीही समजू नये. सुरी यांना 'वाय' दर्जाची सुरक्षा होती. दहशतवाद्यांनी त्यांना पोलिसांदेखत ठार मारले. लखबीरसिंग याला सध्या पाकिस्तानात असलेला दहशतवादी तसेच मूळचा महाराष्ट्रातील नांदेडचा गुंड हरविंदर सिंग ऊर्फ रिंदा याची संपूर्ण साथ आहे.
रिंदा याला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय' पोसत आहे. पंजाबातील शिखांना हिंदूंविरुद्ध भडकावण्याचे 'आयएसआय'चे मनसुबे आहेत. त्यासाठी शिखांमधील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक 'आयएसआय'ने हाताशी धरले आहेत. मुंबईतील अंडरवर्ल्ड गुंड दाऊद इब्राहिम याच्याप्रमाणे 'कौम'साठी त्याग करणारा, अशी लंडा आणि रिंदा यांची प्रतिमा पंजाबातील शिखांमध्ये तयार करण्याचा 'आयएसआय'चा कट आहे.
सुरी हे हिंदू देवतांच्या विटंबनेविरोधात अमृतसरमधील गोपाळ मंदिरासमोर धरणे आंदोलनाला बसले होते. याउपर कुणीही शीख जाती वा अन्य धर्मांच्या बाबतीत वाईटसाईट बोलेल, तर त्यांचाही खून केला जाईल, ही खलिस्तान्यांची उघड धमकी पंजाबातील विशिष्ट समुदाय आणि शिखांना हिंदूंविरोधात एकवटण्याचा 'मेसेज' देणारी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी काढलेला आहे.
सुरी यांच्या हत्येनंतर काही मिनिटांतच आरोपी संदीप सिंग ऊर्फ शँडी याला पोलिसांनी अटक केली होती. त्याला शनिवारी अमृतसर न्यायालयासमोर कडक सुरक्षेत हजर करण्यात आले. शँडीला सात दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली.
पंजाब पोलिस मुख्यालयावर हल्ला
मोहालीतील पंजाब पोलिसांच्या गुप्तवार्ता विभागाच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यातही लखबीरसिंग लंडा याचे नाव समोर आले होते. लंडाविरुद्ध पंजाबात लहान-मोठे 20 गुन्हे दाखल आहेत.
सुरी यांना होती वाय दर्जाची सुरक्षा
सुरी यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. पंधरा सशस्त्र पोलिस, पायलट जिप्सी त्यांच्या दिमतीला असे. पाच पोलिस सदैव त्यांच्या घरी असत. पाकिस्तान आणि पाक गुप्तचर यंत्रणा 'आयएसआय'विरोधातील कठोर भूमिकेमुळे सुरी हे 2010 पासून चर्चेत आले होते.
पाकिस्तानातून मारेकर्यांचे कौतुक
पाकिस्तानात असलेल्या खलिस्तानी गोपालसिंग चावला यानेही सुरी यांच्या मारेकर्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. शिखांना आणि मुस्लिमांना स्वातंत्र्य मिळायलाच हवे. त्यासाठी सुरी यांची हत्या, ही एक चांगली सुरुवात आहे. राज्यातील आणखी काही हिंदू नेत्यांची नावे चावलाने या व्हिडीओत घेतली असून, त्यांनाही सुरीप्रमाणेच अद्दल घडवली जाईल, असे धमकावले आहे. चावला याच्यासह अनेक खलिस्तानवाद्यांनी सुरी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. अफवा पसरविणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा पंजाब पोलिसांनी दिला आहे.