New Zealand vs Pakistan : पावसामुळे पाकिस्तान विजयी, स्पर्धेतील आव्हान कायम

पाकिस्‍तानच्‍या फखर जमान याने झंझावती खेळी करत शतक झळकावले.
पाकिस्‍तानच्‍या फखर जमान याने झंझावती खेळी करत शतक झळकावले.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  रचिन रवींद्रचे दमदार शतक आणि कर्णधार केन विल्यमसनची धडाकेबाज ९५ धावांची खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने पाकिस्तानसमोर ४०२ धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्‍हानात्‍मक लक्ष्‍याचा पाकिस्‍तानच्‍या फखर जमान आणि कर्णधार बाबर आझमनेही तेवढ्याच ताकदीने पाठलाग केला. या दाेघांनी तब्‍बल १९४ धावांची भागीदारी केली; पण पावसामुळे सामन्‍यात दुसर्‍यांदा  व्‍यत्‍यय आल्‍यानंतर डीएलएस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला विजयी घाेषित करण्‍यात आले. या विजयामुळे पाकिस्‍तानच्‍या संघाचे स्पर्धेतील आव्हान जिवंत राहिले आहे.

पाकिस्तानला ४०२ धावांचे लक्ष्य

विश्वचषक २०२३ च्या ३५ व्या सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्‍यात  बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. नाणेफेक जिंकून पाकिस्‍तानने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. न्यूझीलंडला पहिला धक्का ११ व्या षटकात ६८ धावांवर बसला. डेव्हॉन कॉनवे ३९ चेंडूंत ३५ धावा करून बाद झाला. त्याला हसन अलीने यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानच्या हाती झेलबाद केले.

रचिन- विल्यमसन यांची १८० धावांची निर्णायक भागीदारी

पाकिस्तानविरूद्ध रचिन रवींद्रने धडाकेबाज शतक ठोकले . विश्वचषकात तीन शतके झळकावणारा रचिन हा न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला. या सामन्यात ८८ चेंडूत त्याने शतक झळकावले. त्‍याला कर्णधार विल्यमसन यांची भक्‍कम साथ मिळाली. त्‍याने ९५ धावा केल्‍या. या दाेघांनी १८० धावांची निर्णायक भागीदारी केली. ३५ व्‍या षटकामध्‍ये आपल्‍या दमदार खेळीने पाकिस्‍तानला जेरीस आणलेल्‍या न्‍यूझीलंडचा कर्णधार विल्यमसन हा ९५ धावांवर बाद झाला. त्‍याला इफ्तिखार अहमदने फखर जमान करवी झेलबाद केले. यानंतर ३६ व्‍या षटकात न्‍यूझीलंडला तिसरा धक्‍का बसला. शतकी खेळीनंतर रचिन रवींद्रही फटकेबाजीच्‍या नादात बाद झाला. मोहम्‍मद वसीने त्‍याला शकील करवी झेलबाद केले. त्‍याने ९४ चेंडूत १०८ धावा केल्‍या.

३७ षटकांपर्यंत न्‍यूझीलंडने ३ गडी गमावत २७१ धावा केल्‍या होत्या. न्‍यूझीलंडने ४० व्‍या षटकामध्‍ये तीन गडी गमावत ३०० धावांचा टप्‍पा ओलांडला. ४२ व्‍या षटकामध्‍ये न्‍यूझीलंडला चौथा झटका बसला. मिचेल याला हारिस रौफने त्रिफळाचीत (बोल्ड) केले. त्‍याने ४ चौकार आणि १ षटकार लगावत १८ चेंडूत २९ धावा केल्‍या. ४५ व्या षटकात न्यूझीलंडला पाचवा धक्का बसला. मोहम्मद वसीम ज्युनियरने मार्क चॅपमनला क्लीन बोल्ड केले. त्याला २७ चेंडूत ३९ धावा करता आल्या. ४६ षटकानंतर न्यूझीलंडने ३५० धावांचा टप्पा ओलांडला होता.न्यूझीलंडने पाकिस्तानला ४०२ धावांचे लक्ष्य दिले.

फखर जमानची तुफानी खेळी, बाबर आझमची भक्‍कम साथ

न्यूझीलंडने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकात पाकिस्तानला पहिला धक्का बसला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज साऊथीने अब्दुल्ला शफिकला कर्णधार केन विल्यिमसन करवी झेलाबाद केले. केनने शफीकचा शानदार कॅच पकडला. शफिक आपल्या खेळीत  ९ चेंडूत ४ धावाकरून बाद झाला. मात्र यानंतर फखर जमान आणि बाबर आझमने न्‍यूझीलंडच्‍या गाेलंदाजांची धुलाई केली. फखर जमानने ६३ चेंडूत ९ षटकार आणि ६ चाौकाराच्‍या मदतीने शतक पूर्ण केले.

पाकिस्तानसमोर 19.3 षटकात 182 धावांचे लक्ष्य

पावसामुळे थांबलेल्या सामन्याला पुन्हा सुरु झाला तेव्‍हा 19.3 षटकांमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांची गरज हाेती.पावसाच्या व्यत्ययानंतर पुन्हा सुरू झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आपले अर्धशतक झळकावले. त्याने आपल्या खेळीत 55 चेंडूत 56 धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 6 चौकार आणि 1 षटकार लगावला.

फखर जमान आणि बाबर आझमकडून आश्‍वासक फलंदाजी सुरु असताना पुन्‍हा पावसामुळे खेळ पुन्हा थांबवण्यात आला. 25.3 षटकांनंतर पाकिस्तानची धावसंख्या 1 बाद 200 हाेती. फखर जमान 81 चेंडूत 126 धावावर तर.  बाबर आझम 63 चेंडूत 66 धावावर नाबाद हाेते.  पावसामुळे सामन्‍यात दुसर्‍यांदा  व्‍यत्‍यय आल्‍यानंतर डीएलएस नियमानुसार २१ धावांनी विजय मिळवत पाकिस्तानला विजयी घाेषित करण्‍यात आले.

हेही वाचा : 

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news