Tom Latham : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा ‘डबल धमाका’, बांगलादेश पराभवाच्या छायेत

Tom Latham : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा ‘डबल धमाका’, बांगलादेश पराभवाच्या छायेत
Tom Latham : न्यूझीलंडच्या टॉम लॅथमचा ‘डबल धमाका’, बांगलादेश पराभवाच्या छायेत
Published on
Updated on

ख्राइस्टचर्च, पुढारी ऑनलाईन : न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने (Tom Latham) बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात धडाकेबाज द्विशतक झळकावले. या खेळीच्या जोरावर कीवी संघाने पहिला डाव ६ बाद ५२१ धावांवर घोषित केला. किवी कर्णधाराने हेडिंग्ले ओव्हलवर २५२ धावांची खेळी करत या मैदानावर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा विक्रम केला.

सोमवारी (दि. १०) न्यूझीलंडच्या संघाने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशविरुद्ध आपली पकड घट्ट केली. लॅथमच्या दमदार द्विशतकानंतर यजमान संघाने पहिला डाव घोषित केला. यानंतर ट्रेंड बोल्टच्या घातक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशला पहिला डाव अवघ्या १२६ धावांवर आटोपला. मात्र, बांगलादेशला फॉलोऑन द्यायचा की नाही याबाबत निर्णय झालेला नाही, पण ३९५ धावांची आघाडी घेतल्यावर यजमान संघ हा निर्णय नक्कीच घेईल आणि दुसरा डावही झटपट गुंडाळून सामना मागच्या पराभवाचा वचपा काढेल अशी शक्यता क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

न्यूझीलंडने कालच्या (दि. ९) १ बाद ३४९ धावसंख्येपासून आज पुढे खेळायला सुरुवात केली. ९९ धावांवर खेळ असलेल्या डेव्हन कॉनवेने पहिल्यांदा शतक पूर्ण केले. मात्र, तो १०९ धावा करून बाद झाला. शेवटचा कसोटी सामना खेळताना रॉस टेलरने २८ धावा केल्या. हेन्री निकोल्सला आपले खातेही उघडता आले नाही आणि डॅरिल मिशेलने ३ धावा केल्या.

दरम्यान, कर्णधार टॉम लॅथमने (Tom Latham) दुहेरी शतक पूर्ण केले आणि ३७३ चेंडूत ३४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५२ धावांची जबरदस्त खेळी केली. टॉम ब्लंडेलनेही ६० चेंडूत ५७ धावांची नाबाद खेळी केली. न्यूझीलंडने ५२१ धावा करून डाव घोषित केला.

प्रत्युत्तरात बांगलादेश संघ सुरुवातीपासूनच दडपणाखाली आला आणि त्यांनी अवघ्या ११ धावांतच ४ विकेट गमावल्या. त्यानंतर धावसंख्या २७ असताना निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, यासिर अली आणि नुरुल हसन यांनी सहाव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. यासिर अलीने ५५ आणि नुरुल हसनने ४१ धावा केल्याने बांगलादेशचा संपूर्ण संघ ४१.२ षटकात १२६ धावांवर गारद झाला. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ५ तर टीम साऊथीने ३ विकेट्स घेतल्या.

कर्णधार लॅथमची मोठी खेळी… (Tom Latham)

आज (दि. १०) सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १८५ धावांच्या पुढे खेळताना किवी कर्णधारा लॅथमने (Tom Latham) द्विशतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे दुसरे द्विशतक ठरले. यादरम्यान त्याने ख्राइस्टचर्चच्या मैदानावर सर्वाधिक धावा करण्याचा वैयक्तिक विक्रम केला. त्याने ३७३ चेंडूत ३४ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २५२ धावा केल्या. या मैदानावरील ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम किवींचा नियमित कसोटी कर्णधार केन विल्यमसनच्या नावावर होता. त्याने गेल्या वर्षी पाकिस्तानविरुद्ध २३८ धावा केल्या होत्या. माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने येथे १९५ धावा केल्या तर लॅथमने २०१८ मध्ये येथे १७६ धावा केल्या.

आशियाई संघाविरुद्ध १५० धावा…

लॅथमने (Tom Latham) सहाव्यांदा आशियाई संघाविरुद्ध १५० च्या वर धावा केल्या आहेत. या प्रकरणात तो संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. पहिल्या स्थानावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि सध्याचा इंग्लंडचा कर्णधार जो रूट आहे. दोन्ही फलंदाजांनी ७ वेळा अशी कामगिरी केली आहे. लॅथमने माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमसह दुस-या स्थानावर झेप घेतली आहे.

२५० करणारा ओपनर…

सलामीवीर म्हणून २५० किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या सलामीवीरांच्या यादीत लॅथमचे नाव नोंदवले गेले. भारतीय दिग्गज वीरेंद्र सेहवागने चार वेळा अशी कामगिरी केली होती. तर इंग्लंडचा दिग्गज अॅलिस्टर कुक, वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल, ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर, दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ आणि श्रीलंकेचा सनथ जयसूर्या यांनी दोनदा कसोटीत २५० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news