Pakistan Afghanistan Cricket : पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेटमधील नवी रायव्हली

Pakistan Afghanistan Cricket : पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेटमधील नवी रायव्हली
Published on
Updated on

हम्बनटोटा, वृत्तसंस्था : pakistan afghanistan cricket : अफगाणिस्तानला पाकिस्तानवर एकदिवसीय सामन्यातील पहिला विजय नोंदवण्याची संधी होती, परंतु पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह याने चौकार ठोकून दुसर्‍या वनडे सामन्यासह मालिकेत विजय मिळवून दिला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन वनडे सामन्याची मालिका श्रीलंकेतील हम्बनटोटा येथे सुरु आहे. गुरुवारी झालेल्या दुसर्‍या वनडे सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानसमोर विजयासाठी 301 धावांचे आव्हान ठेवले होते. पाकिस्तानने हे आव्हान 49.5 षटकात 9 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या विजयाचा शिल्पकार ठरला तो पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाह!

पाकिस्तानला शेवटच्या षटकात विजयासाठी 11 धावांची गरज होती. अफगाणिस्तानचा वेगावान गोलंदाज फारूकीने नॉन स्ट्रायकरवर असलेल्या शादाब खानला रन आऊट केले. शादाब 48 धावांवर बाद झाला. त्यामुळे पाकिस्तानची अवस्था ही 9 बाद 290 अशी झाली. मात्र पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज नसीम शाहने बॅटने कमाल केली. त्याने फारूकीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर तिसर्‍या चेंडूवर 1 धाव घेतली. तिसर्‍या चेंडूवर स्ट्राईकवर असलेल्या हारिस रौऊफने तीन धावा करत स्ट्राईक नसीम शाहकडे दिला. यावेळी पाकिस्तानला विजयासाठी 2 चेंडूत 3 धावांची गरज होती. मात्र नसीमने षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारत अफगाणिस्तानच्या पहिल्या विजयाचे स्वप्न तोडले. मालिकेत पाकिस्तानने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. (pakistan afghanistan cricket)

आशिया कपची आठवण

एका वर्षापूर्वी एशिया कप 2022 मध्ये देखील असेच काहीसे झाले होते. शारजाहमध्ये अफगाणिस्तानविरूद्धच्या सामन्यात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. गोलंदाजी फारूकीच करत होता. पाकिस्तानची एक विकेट शिल्लक होती. त्यावेळी नसीम शाहने सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारले आणि विजयी घास अफगाणिस्तानच्या तोंडून पळवला.

पाकिस्तानचा मालिका विजय

पाकिस्तानने श्रीलंकेत सुरू असलेल्या तीन वनडे सामन्याच्या मालिकेतील पहिले दोन सामने पाकिस्तानने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. पहिला सामना पाकिस्तानने 142 धावांची जिंकला होता. पाकिस्तानचे 201 धावांचे माफक आव्हान पार करताना अफगाणिस्तानचा संपूर्ण संघ 59 धावात गारद झाला.

पाकिस्तानी फलंदाजावर अफगाण गोलंदाजाचा 'मंकडिंग' वार

अफगाणिस्तानच्या 301 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानने सांघिक खेळी करत विजय साकारला. पण, शादाब खानची विकेट सामन्यात लक्षणीय ठरली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने पाकिस्तानचा अष्टपैलू शादाब खानला ज्या पद्धतीने धावबाद केले त्यामुळे चांगलाच वाद रंगला.

शादाब खान मंकडिंगचा शिकार

पाकिस्तानी खेळाडू शादाब खान अखेरच्या षटकात मंकडिंगचा शिकार झाला. अखेरच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती. अशा स्थितीत शेवटच्या षटकात फजलहक फारुकीच्या पहिल्याच चेंडूवर शादाब मंकडिंग मुळे धावबाद झाला. शादाब खानला अशा पद्धतीने बाद केल्यानंतर पाकिस्तानी चाहते सोशल मीडियावर संताप व्यक्त करत आहेत. अशातच सामन्यानंतर कर्णधार बाबर आझमने देखील आपला राग व्यक्त केला. आझम चांगलाच संतप्त झाला होता. सामना संपल्यानंतर तो अफगाणिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू मोहम्मद नबीकडे गेला आणि त्याने काही गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर संतापाचे भाव स्पष्ट दिसत होते. बाबर आझमचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पाकिस्तान-अफगाणिस्तान क्रिकेटमधील नवी रायव्हली (pakistan afghanistan cricket)

क्रिकेटमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिस्पर्धा ही फार काळापासून प्रचलित आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील शत्रुत्त्व जगासाठी नेहमीच प्रेक्षणीय आहे. आता या रायव्हलीमध्ये आणखी एक भर पडली असून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेटच्या मैदानातील वैर दिवसेेंदिवस गहिरे होत चालले आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळतात. मागील वर्षीच्या ट्वेंटी-20 विश्वचषकात तर मैदानातच हाणामारीचा थरार रंगला होता. अफगाणी चाहत्यांनी पाकिस्तानी चाहत्यांना मारहाण केली, तर पाकिस्तानी फलंदाजाने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर बॅट उगारली होती. सध्या या दोन्ही संघांमध्ये वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. गुरुवारी झालेला दुसरा सामना जिंकून पाकिस्तानने 2-0 ने विजयी आघाडी घेतली असली तरी अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी घातक समजल्या जाणार्‍या पाकिस्तानच्या गोलंदाजी अटॅकला चांगलाच घाम फोडला. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या दुसर्‍या वन डे सामन्यात पाकिस्तानने बाजी मारली पण त्यासाठी पाकिस्तानच्या सर्वच फलंदाजांना खेळपट्टीवर यायला लागले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news