बारामती : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर झालेल्या हल्ल्यावेळी बारामतीत १२ तारखेला धडकण्याचे संकेत एसटी कर्मचाऱ्यांकडून मिळाले होते. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी बारामतीत गोविंदबागेसमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकत्रित झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यापुढे जशास तसे उत्तर देणार असल्याचे सांगून बारामतीला आलात तर दोन पायांवर परत जाणार नसल्याचा इशारा संबधितांना दिला होता. त्या पार्श्वभूमीवर बारामतीत मंगळवारी (दि. १२) पोलीस प्रशासनावरील ताण वाढला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पवार यांच्या निवासस्थानावर केलेल्या हल्ल्यानंतर बारामतीत राष्ट्रवादी कमालीची आक्रमक झाली आहे. सोमवारी समाजमाध्यमातून गोविंदबागेसमोर सकाळी १० वाजता हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार गोविंदबागेकडे कूच करण्यासाठी गावोगावी सोमवारी रात्री नियोजन झाले. मोठ्या संख्येने कार्यकर्ते येथे जमा होत आहेत. पोलिसांनीही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला आहे.
दरम्यान, कार्यकर्त्यांकडून पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आमच्या नेत्यांवर केल्या जाणाऱ्या हल्ल्याचा यापुढे केवळ निषेध केला जाणार नाही. अशा लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. १२ तारखेला बारामतीत येणारे दोन पायांवर परत जाणार नाहीत, असा इशारा राष्ट्रवादीच्या युवक कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीच्या निषेध सभेत दिला होता. अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी येथील संरक्षणाची जबाबदारी घेत योग्य ती कारवाई करू, आजचे आंदोलन थांबवावे, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याची विनंती केल्यावर चर्चा करुन आंदोलन थांबवत असल्याचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी ॲड. सुभाष ढोले, माळेगावचे संचालक योगेश जगताप, राजेंद्र ढवाण, नगरसेवक अमर धुमाळ, सुरज सातव, बिरजु मांढरे, बारामती ऍग्रोचे संचालक राजेंद्र देशपांडे, खादी ग्रामोद्योग माजी अध्यक्ष गणेश शिंदे, अॅड. धीरज लालबीगे, राहुल जाधव, श्रीकांत जाधव, प्रवीण मोरे, पार्थ गालिंदे, सागर खलाटे, योगेश जाधव आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?