राज ठाकरेंच्या अल्टिमेटमबाबत राज्याचे गृहखाते सक्षम : सुप्रिया सुळे

Supriya Sule
Supriya Sule

ठाणे; पुढारी वृत्तसेवा: मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी अल्टिमेटम दिले असले, तरी ठाकरे यांच्या अल्टिमेटमबाबत राज्याचे गृहखाते सक्षम असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. एक खासदार म्हणून आपल्याला खूप कामे असून भोंगे आणि हनुमान चालीसा पेक्षा इंधन दरवाढ आणि महागाईचे मोठे आव्हान असल्याचे सांगत त्यांनी थेट नाव न घेता भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. भोंगे आणि हनुमान चालीसावरून सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे त्याबाबत सुप्रिया सुळे यांनी मात्र, बोलताना सावध प्रतिक्रिया दिली आहे.

यशवंतराव चव्हाण विद्यापीठाच्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आज शुक्रवारी (दि.२९) रोजी ठाण्यात आल्या होत्या. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. मशिदीवरील भोंगे आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेबाबत त्यांना विचारले असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली. मात्र, महागाई विरोधात त्यांनी भाजपवर टीका केली आहे. मशिदी आणि भोंग्यापेक्षा सध्या महागाईचे मोठे आव्हान असून याविरोधात संसदेत देखील अनेक वेळा आवाज उठवला असल्याचे त्यांनी सांगितले.

या मुद्द्यांवरून आंदोलने सुरु असून ती आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. महाविकास आघाडी सरकारबाबत समाधान व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या ट्विटमध्ये कोणत्या सरकारचा टॅक्स जास्त आहे हे सर्वाना कळेल. जीएसटीच्या माध्यमातून राज्याला मिळणारे पैसे उशिरा मिळत असून याविरोधात देखील संसदेत केंद्र सरकारचे लक्ष वेधले असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वच दर कमी केले जात असून यामुळे जवळपास १ हजार कोटींचा तोटा पडत असल्याचे त्यांनी सांगितले. ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबाव आणला जात असल्याच्या मुद्द्यावर देखील त्यांनी सावध भूमिका घेत उत्तर देण्यास टाळाटाळ केली.

महाराष्ट्र पोलीसांवर माझा विश्वास

एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शरद पवार यांच्या निवास्थानी झालेल्या हल्ल्याच्या पाठीमागे कोण आहे ? या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी कोणाचेही नाव घेतले नाही. मात्र, महाराष्ट्र पोलिसांवर आपला पूर्ण विश्वास असून तापसानंतर सत्य बाहेर येईल. त्यामुळे यावर आता भाष्य करणे योग्य नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

देशमुख आणि मालिकांवर अन्यायच झाला

अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्यावर अन्यायच झाला असल्याचे सुळे म्हणाल्या. या दोघांवर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये सातत्य नसल्याचे सांगत केंद्रीय तपास यंत्रणांवर नाराजी व्यक्त केली.

गणेश नाईक प्रकरणात पीडित महिलेला मदत करणार

भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्या प्रकरणावर बोलण्यापेक्षा पीडित महिलेला मदत करणार असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. कोणत्याही पक्षाच्या नेत्यावर अशा प्रकारे आरोप झाले तरी यामध्ये मुले भरडली जातात. त्यामुळे केस कोणतीही असो न्याय मिळणे महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश नाईक प्रकरणात आपण प्रत्यक्ष बोलणार नाही. मात्र, मदत मागायला कोण आले तर मदत करणार असल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news