पुढारी ऑनलाईन : संसदेची सुरक्षाव्यवस्था भंग करण्याची घटना आणि विरोधी खासदारांच्या निलंबनाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यसभा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांना पत्र लिहिले आहे. संसद सुरक्षेतील त्रुटी आणि खासदारांच्या निलंबनाची तातडीची चौकशी करण्याची विनंती पवार यांनी पत्रातून केली आहे.
संबंधित बातम्या
संसद अधिवेशनादरम्यान १३ डिसेंबर रोजी दोन तरुणांनी लोकसभेमध्ये घुसखोरी करून धुराचे नळकांडे फोडले होते. संसदेवरील दहशतवादी हल्ल्याचा स्मृतीदिनी घडलेली ही घटना खूप गंभीर स्वरुपाची असल्याचे शरद पवार यांनी म्हटले आहे.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संसद खासदारांनी त्याबाबत स्पष्टीकरण मागणे स्वाभाविक आहे आणि सरकारकडून यावर स्पष्टीकरण हवे होते. पण, हे निराशाजनक आहे की सरकारने यावर केवळ भाष्य करणे टाळले नाही तर त्याबद्दल स्पष्टीकरण मागणाऱ्या संसद सदस्यांवर निलंबनाची कारवाई केली. या घटनेचे स्पष्टीकरण मागणाऱ्या संसद सदस्यांना निलंबित करण्याचा निर्णय जबाबदारी आणि पारदर्शकतेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचे दिसते. संसदेच्या सदस्यांना स्पष्टीकरण मागण्याचा आणि संसद सुरक्षेची खात्री करुन घेण्याचा कायदेशीर अधिकार आहे, जे आपल्या देशाच्या लोकशाहीचे प्रतीक आहे, असे पवार यांनी म्हटले आहे.
सरकारकडून स्पष्टीकरण मागणाऱ्या संसदेतील ९० हून अधिक सदस्यांना निलंबित करण्यात आले आहे, त्यापैकी सुमारे ४५ राज्यसभेतील सदस्य आहेत, ही लोकशाहीची विडंबना आहे. संसदीय कार्यपद्धती आणि लोकशाही मूल्यांची अखंडता राखण्याच्या हितासाठी या प्रकरणाकडे लक्ष द्यावे, अशी विनंती शरद पवार यांनी धनखड यांच्याकडे केली आहे.