नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले जात नसल्याचा आरोप करत शरद पवार गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तक्रार करण्यासाठी थेट दिल्ली गाठली. ७२ तासात आयोगाने कारवाई केली नाही तर मग आम्हाला पुढे जावे लागेल, असे म्हणत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ निवडणूक चिन्ह अजित पवारांना दिले. पुढे शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्ष चिन्ह दिले. मात्र त्यानंतरही दोन्ही गटांमधील वाद शमण्याचे नाव घेत नाही. दोन दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुनावणी पार पडली. यावेळी अजित पवार गटाने शरद पवारांचे नाव किंवा फोटो वापरू नये तसेच घड्याळ हे पक्षाचे चिन्ह वापरताना ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, अशी सूचना लिहिण्यास सांगितले होते. मात्र, अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयाच्या या सूचनेचे पालन केले जात नसल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. अजित पवार गटाच्या नेत्यांच्या सोशल मीडियावरील फोटोंचे पुरावे देखील यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सादर केले. आणि या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे पुत्र आणि आमदार अनिकेत तटकरे यांनी अलीकडेच एका कार्यक्रमात शरद पवार यांचा फोटो वापरल्याचे समोर आल्याचे ते म्हणाले.
… तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ.. आव्हाडांचा इशारा
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या सूचना अजित पवार गट पाळत नाही. त्यांना न्यायालयाने सूचना लिहायला सांगितले आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाला अजित पवार गटावर कारवाई करावी लागेल. त्यांनी जर कारवाई केली नाही तर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. कारण न्यायालयाने दिलेल्या सुचनांचे पालन न करणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान आहे," असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
दिल्ली दौऱ्यावर असलेले आव्हाड केजरीवाल यांच्या अटकेवर बोलताना म्हणाले की, देशात राजकीय वातावरण बिघडत चालले आहे. आपण हुकुमशाहीकडे जात आहोत. आगामी निवडणुका निष्पक्ष होतील असे वाटत नाही. इलेक्टोरल बॉण्डचा गैरव्यवहार बाहेर आला आहे. तो बाहेर येत असताना केजरीवाल यांना अटक झाली. अलीकडे दोन मुख्यमंत्र्यांना अटक झाली. १९७७ ला जसे वातावरण होते तसे वातावरण आता सुरू झाले आहे. मात्र लोक जागरूक झाले आहेत. असेही ते म्हणाले.
हेही वाचा :