नवाब मलिक यांचे ट्विट, रविवारी करणार धमाका; ‘त्या’ हॉटेलमध्ये…

नवाब मलिक यांचे ट्विट, रविवारी करणार धमाका; ‘त्या’ हॉटेलमध्ये…

गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग एक गौप्यस्फोट करून विरोधकांवर आरोप करणाऱ्या नवाब मलिक यांचे नवे ट्विट समोर आले आहे. रविवारी आणखी एक गुपित फोडणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर मलिक आणखी कोणता गौप्यस्फोट करणार, याकडे लक्ष लागले आहे.

क्रूझवर छापा टाकून एनसीबीचे विभागीय संचालक अधिकारी समीर वानखेडे यांच्याबाबत एकामागोमाग एक गौप्यस्फोट केले. त्यानंतर वानखेडे यांची खातेअंतर्गत चौकशीही केली. वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचेही त्‍यांनी  सांगितले.  तसेच वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करून अनेक आरोपही मलिकांनी केले होते.

त्यानंतर मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ड्रग पेडलरशी संबध असल्याचा आरोप केला. त्यानंतर फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी मलिक यांच्यावर टीका केली होती. मलिक यांनी भाजपच्या नेत्यांचे ड्रग पेडलरशी संबंध असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी दिवाळीनंतर आम्ही बॉम्ब फोडू, असा इशारा दिला. त्याला मलिक यांनी आम्ही तयार आहोत, असे उत्तर दिले. हा सामना रंगत असताना आता मलिक यांनी बुधवारी नवीन ट्विट केले असून दिवाळीच्या शुभेच्छा देत 'शुभ दीपावली, आप सभी की दिवाली मंगलमय हो. होटल 'The Lalit' मे छुपे है कई राज़…मिलते है रविवार को… असे सांगत सस्पेन्स तयार केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असल्याचे सांगितले असले तरी मलिक येत्‍या रविवारी नेमके काणते 'राज' बाहेर काढणार आहेत, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

नवाब मलिक ट्विट: देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत सोमवारी खळबळ उडवून दिली. जयदीप चंदुलाल राणा या ड्रग्ज पेडलरचा देवेंद्र फडणवीस यांच्या आश्रयाखाली अमली पदार्थांचा व्यापार सुरू होता, असे सांगत याच राणाने अमृता फडणवीस यांच्या 'रिव्हर साँग' या व्हिडीओला आर्थिक मदत केल्याचा दावा मलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी मलिक यांनी राजकीय बॉम्ब टाकल्याने महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील संघर्ष आणखी टिपेला जाण्याची चिन्हे आहेत. पत्रकार परिषदेत मलिक यांनी सुरुवातीला अमृता फडणवीस यांचे जयदीप राणासोबतचे छायाचित्र ट्वीट केले. त्याचबरोबर या फोटोचा आधार घेत त्यांनी 'चला आज भाजप आणि ड्रग्ज पेडलर यांच्या नात्यावर चर्चा करुया' असा उल्लेख या ट्वीटमध्ये करीत खळबळ उडवून दिली हाेती.

हेही वाचलं का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news