पुढारी ऑनलाईन डेस्क : पर्यावरणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. (National Pollution Control Day 2022) त्यातील एक समस्या म्हणजे प्रदूषण. वातावरणात, पाण्यात, हवेत किंवा अन्नात सजीवांना हानिकारक असलेले पदार्थ मिसळण्याच्या क्रियेला थोडक्यात प्रदूषण म्हणतात. प्रदूषण फक्त भारतातच नाही तर जगभरात भेडसावणारी समस्या आहे. याचा परिणाम पर्यावरणाचे संतुलन बिघडण्यावर होतो. त्याचबरोबर मानवी जीवनावरही विपरीत परिणाम होत आहे. आज राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. त्यानिमित्ताने आपण प्रदूषणापासून आपलं आरोग्य कसं सुरक्षित ठेवावं यासाठी काय खावे हे पाहणार आहोत.
आज २ डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस. 1984 च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर लोकांमध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी जागृत करणे, प्रदूषण रोखण्यास मदत करणाऱ्या कायद्यांची जाणीव करून देणे. औद्योगिक आपत्तींचे व्यवस्थापन आणि नियंत्रण याबाबत जागरूकता पसरवणे आदी उद्दीष्ट ठेवून हा दिवस साजरा केला जातो.
भोपाळ गॅस दुर्घटना ही जगातील सर्वात मोठ्या दुर्घटनेपैकी एक आहे. ही घटना घडून २०२२ ला ३८ वर्षे पूर्ण होत आहेत. या दुर्घटनेत मिथाईल आयसोसायनेट नावाचा विषारी वायू मोठ्या प्रमाणावर बाहेर पडला होता. यात अनेकांचा मृत्यू झाला. लोक जखमीही झाले. हे परिणाम मर्यादित काळापर्यंत नव्हते तर त्यानंतरच्या अनेक पिढ्यांना अंपगत्व आलं होतं. आजही या ठिकाणी शारिरीक अपंगत्व किंवा दोष असलेली बालके जन्माला येतात. अनेकांना श्वसनाचे आजार जडले. आज जगातील परीस्थिती पाहता दहा लोकांपैकी नऊ जणांना सुरक्षित हवा मिळत नाही. आणि त्यामुळे दीर्घकाळापर्यंत श्वसनाचे विकार, फुफ्फुसाचा कर्करोग, मेंदू किंवा किडनीचे नुकसान आणि हृदयविकाराचा धोका संभवतो.
भारतातील उत्तरेकडील भाग विशेषत: गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात आहे. हिवाळ्यात तर दिल्लीने प्रदूषणाचा उच्चांक गाठला आहे. प्रदुषणामुळे लोकांना दैनंदिन चालण्यासाठी किंवा कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी बाहेर पडणे धोकादायक बनते. भारतातील वायू प्रदूषणाच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी वैयक्तिक आणि सामुहिकरित्याही अधिक उपाययोजना करणे आवश्यक आहे. पण प्रदूषणापासून आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी आपल्या जीवनशैलीत काही बदल करणेही महत्त्वाचे आहे.
आवश्यक ते पदार्थ खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. आणि प्रदूषणाचे आपल्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, जीवनसत्त्वे, आले, हळद, पेपरमिंट, तुळशी, लवंग, दालचिनी यासारख्या औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा समावेश असलेला आहार आपल्याला प्रदूषणाच्या हानिकारक परिणामांशी लढण्यास मदत करतो.
प्रदूषणापासून आपल्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी संत्र्यासारख्या लिंबूवर्गीय फळांचा आहारात समावेश करावा. ज्यामुळे जळजळ आणि अॅलर्जी कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन-सी समृद्ध अन्नामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि वायू प्रदूषणाचा परिणाम आपल्या आरोग्यावर कमी होतो. सूज वाढवणाऱ्या ऍलर्जी आटोक्यात आणण्यासाठी व्हिटॅमिन सी असलेले खाद्यपदार्थ खावेत. त्यासाठी संत्री, स्ट्रॉबेरी, सफरचंद, टरबूज खा. लाल मिरची, काळे, अजमोदा, ब्रोकोली, फ्लॉवर, पालक यासारख्या भाज्यांमध्येदेखील व्हिटॅमिन सी असते.
ऑलिव्ह ऑईल, सूर्यफूल बियाणे, बदाम हे व्हिटॅमिन ई (Vitamin E) ने भरलेले असतात. हे पदार्थ हवा प्रदूषणाच्या दुष्परिणामांपासून संरक्षण देतात.
विविध संशोधनात सिद्ध झालं आहे की, ओमेगा-फॅटी ऍसिड असलेले अन्न वायू प्रदूषणामुळे होणारी जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात. त्यासाठी अक्रोड, ज्यूटच्या बीया आणि सॅल्मन खा.
गाजर, काळे रताळे, जर्दाळू खाणे ज्यात अत्यावश्यक जीवनसत्व ए आहे. या पदार्थांचाही समावेश आहारात करा. निरोगी राहण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा.
सफरचंदांमध्ये फेनोलिक अॅसिड आणि फ्लेव्होनॉइड्स असतात. जे वायू प्रदूषणामुळे हवेच्या मार्गात होणारी जळजळ कमी करण्यास मदत करतात. अननसमधील एन्झाइम हे श्वासनलिकेवरील सूज कमी करते आणि खोकल्याच्या समस्या सोडवण्यास मदत करते.
बऱ्याच लोकाना जळजळ मोठ्या प्रमाणात होत असते. वायू प्रदूषणामुळे फुफ्फुसाची जळजळ कमी करायची असेल तर आल्याचा समावेश आहारात करा.
ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात. जी तुम्हाला वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या ऍलर्जीच्या लक्षणांचा सामना करण्यास मदत करतात. पण, ग्रीनटी कडे जाण्यापूर्वी हेही लक्षात घ्या की पुरेसे पाणी पिल्याने देखील शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत होते.
हळदीचा उपयोग प्राचीन काळापासून औषधी वनस्पती म्हणून केला जात आला आहे. आपल्या घरात मसाल्याच्या पदार्थात असणारा दैनंदिन वापरातील घटक कोणता असेल तर हळद. हळदीमुळे खोकला आणि सर्दी कमी करण्यास मदत करतात.
तुळस घशातील जळजळ दूर करण्यास मदत करते. तुळशीच्या पानांचा काढाही खूप गुणकारी असतो. तुळशीची पाने कच्ची खाल्ली तरीही चालतात.
टोमॅटो हा जीवनसत्त्वे आणि मिनरल्स मिळवण्यासाठीचा एक चांगला स्रोत आहे आणि श्वसनाच्या समस्या टाळण्यास मदत करतो.
कोथिंबीर, ओवा सारख्या पालेभाज्या देखील तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करत असतात. तर प्रक्रिया केलेले आणि साखरयुक्त अन्न शरीरात जळजळ वाढवू शकते आणि ते टाळले पाहिजे.
हेही वाचा