National Parents Day : ‘माझा बाप माझी बुलंद कहाणी’… नातं बाप-लेकीचं

संग्रहित छायाचित्र.
संग्रहित छायाचित्र.

पुढारी ऑनलाईन : 'श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी, लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी'… या कवितेच्‍या ओळी नुकत्‍याच तुम्‍ही ऐकल्‍या असतील किंवा वाचल्‍या असतील. घटना तशी राजकीय हाेती. राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षामध्‍ये बंड झालं. यानंतर झालेल्‍या पक्षाच्‍या मेळाव्‍यात राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या नेत्‍या सुप्रिया सुळे यांनी व्‍यासपीठावर आपलं वडिलांशी असणारं नातं अधोरेखित केलं होतं.  यावेळी त्‍यांनी १५ वर्षांपूर्वी दासू वैद्य यांनी त्‍यांच्‍यासाठीच लिहिलेली कविता वाचली होती. मुलीचे आणि वडिलाचं नातं कसे असतं याचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण होतं. पालक म्‍हणून मुलींचे संगाेपन करताना आई एवढीच वडिलांचीही जबाबदारी असते. बहुतांश मुलींचे आपल्या आईपेक्षा आपल्या वडिलांशी भावनिक बंध घट्ट असतात. आज राष्ट्रीय पालक दिन त्यानिमित्तान मुली आपल्या आईपेक्षा बाबांशी भावनिकदृष्य्या का जवळ असतात ते पाहूया. (National Parents Day)

आपल्याला मुलगी झाल्याच कळताच आनंदी झालेला बाबा, जन्म झाल्यावर तिला मायेने हळूवार जवळ घेवून  कुरवाळणारा, तिने हुंकारत का असेना; पण तिने आपल्या शब्दांना प्रतिसाद द्यावा म्हणून तासनतास तिच्या भाषेत न थकता बोलणारा, तिने 'बाबा'  म्हणून पहिल्यांदा हाक मारल्यावर सगळ्यांना सांगणारा,  मुलीने पहिलं पाऊल टाकल्यावर आनंदित झालेला, तिने दिवसागणिक अशीच पावले टाकत तिचं धाडस निर्माण करणारा, मुलीच्या घरभऱ छोट्या-छोट्या पावलांनी दुडूदुडू पावले पडताना आनंदित झालेला, ती शाळेत जायला लागली आणि तिला हवं नको पाहणारा, मुलगी वयात आली की तिच्‍या काळजीने काहुरलेला मनाचा बाबा आणि मुलगी सासरी गेली की धाय माकलून रडणारा 'बाबा' तुम्ही आपल्या सभोवताली पाहिला असेल.

National Parents Day

National Parents Day : बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये

गायक आणि संगीतकार सलील कुलकर्णी यांचं "तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं, मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं, सासुराला जाता जाता उंबरठ्यावर बाबासाठी येईल का गं पाणी डोळ्यामध्ये,  मनाला भिडणाऱ्या या ओळीतून एक बाप आपल्या मुलीसाठी कसा हळवा होतो आणि दासु वैद्य यांच्या " "श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी; लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!" या ओळीतुन आपल्या थकलेल्या बापासाठी आयुष्याच्या एका वळणावर एक मुलगी कशी बुलंद असते हे समजून जातं. अशाप्रकारे 'वडिलांसारख' अदभुत रसायन आपल्याला घराघरात पाहायला मिळत असेल. काही अपवाद असतीलही…

काय सांगतात तज्ज्ञ

मुलीचा जन्म होतो आणि तिच्या आईनंतर तिच्या बाबांशी ती भावनिकदृष्ट्या जवळ असते. एका अभ्यासानुसार, मुलीच्या जीवनावर पित्‍याचा प्रभाव तिच्या मानसिक विकासावर होत असतो. वडिलांशी चांगल नातं असलेल्या मुलींमध्ये आत्मविश्वास, स्पष्टता,  स्वाभिमान आणि ते कोण आहेत आणि त्यांना काय हवे आहे याचे सखोल ज्ञान ही आदी वैशिष्ट्ये पाहायला मिळतात.  त्याचबरोबर मुलगी जेव्हा इतर पुरुषांशी वर्तन करत असते या वर्तनावर तिच्या बाबांशी असलेल्या वर्तनाचा प्रभावही होत असतो.

डॉ. कल्याणी कुलकर्णी (MD,  Homeopathy, Counselor  ) सांगतात की, पूर्वी वडील आणि मुलांच नातं हे मर्यादित स्वरुपात होतं. अलिकडच्या काही वर्षांमध्ये मुलं आणि त्यांचे पालक यांचा निखळ संवाद होवू लागला आहे. पालक आपल्या मुलांच्या भावनांची कदर करत त्यांच्या कलाने वर्तन करत दिसत आहेत.

अलिकडे 'आई' मल्टिटास्किंग झाल्याने बाबा आणि आईचा दोघांचा मुलांशी संबंध येत असतो. प्रत्येत मुलीला आपले 'बाबा' आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व असतो. अलिकडच्या काही वर्षांमध्ये "बाबा' भुमिकेतील पुरुष हा आपल्या मुलींचा कल ओळखत तिच्या भावनेचा कदर करत असताना दिसत आहे. आजकाल बाबा आपल्या लहान मुलीच डायपर बदलल्यापासून तिच्या किशोरवयीन गोंधळ समजून घेत तिच्याशी वर्तन करताना दिसतं आहे. निखळ संवाद आणि वर्तनामुळे दोघांमधील भावनिक बंध दिवसेंदिवस अधिक घट्ट होताना दिसत आहे. याच भावनिक बंधामुळे मुलीला आपल्या बाबांजवळ खुप संरक्षित वाटत असतं. आपले बाबा आपल्यासोबत असणं हे मुलींना अधिक सरंक्षित आणि आत्मविश्वासदायक वाटतं असतं.

National Parents Day : तिच्या नजरेतून "बाबा"

मुलगी आणि वडिल यांच्यातील नाते खास, विश्वासपुर्ण आणि प्रेमळ असते. वडील हे आपल्या मुलीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचं असं व्यक्तिमत्त्व असतं.

जाहिरात क्षेत्रात काम करणारी रेणू राजीव भोसले सांगते की, "माझा आणि माझ्या बाबांचा दोघांचाही स्वभाव व्यक्त होण्याचा नाही. पण ते माझे जितके लाड करतात त्यातूनच त्यांचे प्रेम व्यक्त होते. तिच्या मते तिच्या बाबांनी तिला अपयशाला सामोरं जाण्यात कसं यशस्वी व्हावं याची प्रेरणा दिली. ती म्हणते माझ्या बाबांकडून एक गोष्ट शिकले की, "बापाकडे आपण उडण्यासाठी हट्ट करत असतो आणि बापाने आपल्याला फक्त पंखच काय तर आकाश सुद्धा दिलेलं असतं."

अधिकारी असणारी प्रिया काटकर सांगते की, "मी आज जे काही आहे ते माझ्या वडिलांच्यामुळेच आहे. माझ करीअर करु शकले ते फक्त माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे. ते अल्पशिक्षित असूनही आपली मुलगी शिकुन मोठी झाली पाहिजे या भावनेने मला आर्थिक आणि मानसिक/नैतिक पाठिंबा देत घडवलं. 

मराठी विषयाची अभ्यासक असणारी सुस्मिता खुटाळे सांगते, माझा ग्रामीण भागात माझा जन्म झाला. मी माझी आईशी जितक्या मनमोकळेपणाने विविध विषयावर व्यक्त होवू शकते. तितकच मी माझ्या वडिलांशी व्यक्त होवू शकते. माझ्या आदर्श व्यक्तींपैकी एक म्हणजे माझे बाबा आहेत.त्यांनी मुलगा-मुलगी भेद न करता माझ्या मनाप्रमाणे शिक्षण घेवू दिलं. नोकरी करण्यासाठी, स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी पाठिंबा दिला. "लोक काय म्हणतील" या टिपीकल गोष्टी माझ्यापर्यंत येऊच दिल्या नाहीत.

National Parents Day : का साजरा केला जाताे राष्ट्रीय पालक दिन 

दरवर्षी जुलै महिन्याच्या चौथ्या रविवारी राष्ट्रीय पालक दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस २३ जुलै रोजी साजरा केला जाणर आहे. आपले पालकत्व असणारे आपले आई-बाबा आपल्याला आयुष्य जगण्यास खंबीर बनवत  असतात. ते आपल्यावर निरपेक्ष प्रेम, कष्ट करत घडवत असतात. आपल्या पालकत्वाच्या प्रती प्रेम व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news