नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद

नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद(छाया: हेमंत घोरपडे)
नाशिककरांनी लुटला तीळगुळासह पतंगोत्सवाचा आनंद(छाया: हेमंत घोरपडे)

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई, कानी पडणारा गई बोला रे.. दे ढील..चा आवाज अशा उत्साहपूर्ण वातावरणात सोमवारी (दि.१५) नाशिककरांनी पतंग उडवण्याचा आनंद लुटला. आकाशात रंगीबिरेंगी पतंगांनी गर्दी केली. यावेळी 'तीळगूळ घ्या, गोड गोड बोला' म्हणत नागरिकांना मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.

इंग्रजी वर्षातील पहिला सण अर्थात मकरसंक्रांतीचा उत्साह पाहायला मिळाला. शहर-परिसरातील इमारतीचे टेरेस, मोकळे मैदाने ही सकाळपासून पतंगोत्सवासाठी गर्दीने फुलून गेली. युवावर्गासह बच्चेकंपनी तसेच ज्येष्ठांनी पतंग उडविण्याचा मनमुराद आनंद लुटला. सकाळच्या सत्रात हवेचा वेग चांगला असला तरी दुपारच्या सत्रात हवा नसल्याने नाशिककरांचा काहीसा हिरमोड झाला. मात्र, साडेतीननंतर हवेचा जोर वाढल्याने आकाश पतंगांनी भरून गेले. यावेळी आकाशात उंचच-उंच पतंग नेण्याबरोबरच एकमेकांचे पतंग काटण्यासाठी पतंगप्रेमींमध्ये स्पर्धा लागली.

नाशिककरांनी सायंकाळनंतर आप्तस्वकीय व मित्रमंडळींना तीळगूळ वाटप करत मकरसंक्रांती च्या शुभेच्छा दिल्या. महिलावर्गाची संक्रांतीचे वाण देण्यासाठी लगबग सुरू होती. रविवार कारंजा येथील चांदीचा गणपती, नवश्या गणपती, कपालेश्वर, सांडव्यावरील देवी, कालिका माता मंदिरासह शहरातील लहान-माेठ्या मंदिरांमध्ये वाण देण्यासाठी महिलांनी गर्दी केली.

प्रभू रामचंद्रांचा डंका

अयोध्याच्या सोहळ्यामुळे सध्या सर्वत्र राममय वातावरण निर्माण झाले आहे. मकरसंक्रांतीवरदेखील रामचंद्रांचा डंका पाहायला मिळाला. पतंग उडविताना डीजेच्या तालावर हिंदी-मराठी गाण्यांसह ‌ 'यंदा राम आयेंगे तो अंगना सजावूंगी, राम जी निकली सवारी, रामजी की लिला हे न्यारीे' यासह प्रभू रामचंद्रांवरील विविध गाणे वाजविण्यात आली.

पतंगांनी वेधले लक्ष

मकरसंक्रांतीला नाशिककरांनी विविध आकारातील व रंगसंगतीचे पतंग उडवित आनंद लुटला. त्यामध्ये प्रभू रामचंद्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा असलेल्या पतंगींचा समावेश होता. याशिवाय कार्टून्स, विविध कलाकारांचे फोटाे असलेल्या पतंगी तसेच भूत व मटका अशा निरनिराळ्या आकारातील पतंगींना पसंती मिळाली. या पतंगींनी साऱ्यांचेच लक्ष वेधले.

सोशल मीडियातून शुभेच्छा

मकरसंक्रांतीनिमित्ताने नेटिझन्स‌ने पहाटेपासून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव केला. तीळगूळ घ्या गोड गोड बोला म्हणत व्हॉटसअॅप, फेसबुक, इन्स्टा यासह अन्य सोशल माध्यमातून एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news