नाशिक: पुढारी वृत्तसेवा- विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या बनावट कागदपत्रांची तपासणी करत फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. या कागदपत्रांची वैधता तपासण्याचे काम सुरू आहे. तपासणीनंतर त्यात सत्यता आढळल्यास संबंधिताविरोधात फौजदार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही केली जाईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्याकडून देण्यात आली.
ऐन निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने भाजप मंत्र्यांशी संबंधित कामावरून ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यासाठी दिलेले पत्र चर्चेचा विषय झाला आहे. बांधकाम विभाग एकमध्ये दिंडोरी तालुक्यातील ७० लाखांच्या रस्त्याच्या निविदाही दोन महिन्यांपासून वादात सापडल्या आहेत. या प्रकरणातही भाजप तालुकाध्यक्षाच्या माध्यमातून केंद्रीय मंत्र्यांकडून एका ठेकेदाराने काम मिळवल्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या जवळच्या ठेकेदाराने त्या कामाच्या निविदा भरल्याने या निविदा वादात सापडले होते.
दरम्यान राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रकाश वडजे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र पाठवून प्रतिक देशमुख या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्याच मागणी केली होती. त्या पत्रातील मागणीप्रमाणे बांधकाम विभागाकडून चौकशी सुरू असतानाच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी पत्र पाठवून या ठेकेदाराने निविदासोबत जोडलेल्या कागदपत्रांची चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अभियंता डॉ. अर्जुन गुंडे यांनी कागदपत्रांची तपासणी करून बनावट कागदपत्र जोडलेल्या प्रतिक देशमुख या ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जलसंधारण विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांना पत्र पाठवून या कागदपत्रांच्या वैधतेबाबत अहवाल देण्यास सांगितले आहे. या विभागांकडून अहवाल आल्यानंतर संबंधित ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला जाईल.
-संदीप सोनवणे, कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग १, जिल्हा परिषद नाशिक
अशी आहेत बनावट कागदपत्र
सुरगाणा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केल्याच्या दाखल्यावर लघुपाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या सह्या आहेत. याच पद्धतीने काम पूर्ण केल्याचे दाखले जोडलेल्या इतर कागदपत्रांवरही पत्ते चुकीचे असणे, एका विभागाच्या कामावर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सही व शिक्क्यांचा वापर करणे आदी अनियमितता असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा –