नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा
बिहारमधून 59 मुलांना सांगलीला मदरशात पाठविण्याच्या प्रकरणाला वेगळेच वळण लागले. या मुलांच्या पालकांनी शनिवारी (दि. 3) मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात येऊन, आमची मुले आमच्या मर्जीने सांगलीच्या मदरशात दाखल करण्यासाठी मौलाना घेऊन जात होते, असा दावा केल्याने पोलिसांची कोंडी झाली आहे.
दानापूर – पुणे एक्स्प्रेसमध्ये दि. 30 मे रोजी 59 लहान मुलांना नेले जात असताना बालकांच्या तस्करीच्या संशयावरून प्रवाशाने रेल्वे प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवरून आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांनी भुसावळला 30, तर मनमाडला 29 मुलांना ताब्यात घेऊन त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली. शिवाय त्यांच्यासोबतच्या चार मौलवींना अटक करून त्यांच्याविरुद्ध थेट बालतस्करीचा गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मुलांचे पालक बिहारमधून थेट मनमाड रेल्वे पोलिस ठाण्यात आले आणि तस्करीच्या आरोपांचा इन्कार केला. आम्ही मुलांना आमच्या मर्जीने सांगलीच्या मदरशात दाखल करण्यासाठी मौलानांसोबत पाठवले आहे. त्यांच्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. आमच्या मुलांना बालसुधारगृहात आणि मौलानांना तुरुंगात का टाकले? असा प्रतिसवाल करून आरपीएफ आणि रेल्वे पोलिसांच्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली.
मी माझ्या भावाला मौलानासोबत सांगलीच्या मदरशात शिक्षणासाठी पाठवले होते. यात मानवी तस्करीचा कोणताच प्रकार नसून आम्ही आमच्या मर्जीने मुलांना शिक्षण घेण्यासाठी पाठवले असून, पोलिसांनी केलेली कारवाई चुकीची आहे. -अली रजा, (मुलाचा मोठा भाऊ)