नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जायकवाडीसाठी पाणी सोडल्याने गंगापूर, दारणा व मुकणे धरणातून उपलब्ध पाणीआरक्षण केवळ १२ जुलैपर्यंतच पुरणार आहे. त्यामुळे पाणीकपात क्रमप्राप्त बनली असताना आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यकर्त्यांकडून पाणीकपातीच्या प्रस्तावावर निर्णय दिला जात नसल्यामुळे अखेर महापालिकेने अघोषित पाणीकपात सुरू केली आहे.
स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रातील रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे तसेच ६०० मिमी व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणीच्या कामाचे कारण देत शहरातील ९० टक्के भागातील पाणीपुरवठा गेल्या शनिवारी (दि.२) दिवसभर बंद ठेवल्यानंतर आता मुकणे धरणावरील रॉ वॉटर पंपिंग स्टेशन येथे महावितरण कंपनीच्या रेमण्ड सबस्टेशनमध्ये दुरुस्तीचे कारण देत नवीन नाशिक, नाशिक पूर्व, नाशिकरोड व सातपूर विभागांतील पाणीपुरवठा येत्या शनिवारी (दि. ९) बंद ठेवला जाणार आहे.
मेंढीगिरी समितीच्या अहवालाचा संदर्भ देत नाशिक व नगरच्या धरणांतील ८.६ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात आले. त्यामुळे महापालिकेने ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी नोंदवूनदेखील महापालिकेच्या वाट्याला केवळ ५३१४ दशलक्ष घनफूट पाणी आले आहे. उपलब्ध पाणी आरक्षण ३१ जुलैअखेर पुरविण्याचे नियोजन करण्याची जबाबदारी महापालिकेवर आहे. मात्र, दैनंदिन पाणीवापर लक्षात घेता उपलब्ध पाणीआरक्षण केवळ १२ जुलैपर्यंतच पुरू शकणार आहे. त्यामुळे डिसेंबरपासून आठवड्यातील दर शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने आयुक्तांच्या मान्यतेसाठी सादर केला होता. मात्र, लोकसभा निवडणूक तोंडावर असल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी तसेच विरोधी पक्षांनीही या पाणीकपातीला विरोध केल्यामुळे हा प्रस्ताव मागे पडला. पालकमंत्री दादा भुसे यांनी नाशिक शहर व जिल्ह्यासाठी किती पाणी उपलब्ध आहे याचा धरणनिहाय नुकताच आढावा घेतला. या बैठकीमध्ये सौम्य स्वरूपात का होईना पाणीकपात लागू होईल, अशी अपेक्षा होती. त्या दृष्टिकोनामधून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी तयारीदेखील केली होती. मात्र, पालकमंत्र्यांनी पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करा, अनधिकृत पाणीवापर थांबवा अशा सूचना देत पाणीकपातीचा थेट निर्णय घेण्याचे टाळले. त्यामुळे उपलब्ध पाणीआरक्षण जुलैअखेर कसे पुरवायचे, असा प्रश्न प्रशासनाला पडला आहे. त्यातून दुरुस्तीच्या नावाखाली अघोषित पाणीकपात सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
या भागात होणार पाणीबाणी!
गेल्या शनिवारी (दि. २) स्मार्ट सिटी कंपनीमार्फत बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्र येथील रॉ वॉटर पाइपलाइनमधून कनेक्शन करणे तसेच ५०० मि.मी. व्यासाचे पवननगर रायझिंग मेनचे कनेक्शन जोडणीचे काम हाती घेतले जाणार असल्याचे कारण देत गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे शहरातील बारा बंगला, पंचवटी, नीलगिरी बाग, गांधीनगर तसेच नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. रविवारी (दि.३)देखील कमी दाबाने कमी वेळ पाणीपुरवठा झाला होता. आता मुकणे धरणावरील पंपिंग स्टेशनला पाणीपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रेमण्ड सबस्टेशनमधील दुरुस्तीचे कारण पुढे करत येत्या शनिवारी (दि.९) नवीन नाशिक विभागातील प्रभाग क. २२, २८, २९, ३१, नाशिक पूर्व विभागातील प्रभाग क्र. ३०, २३ (भागशः), नाशिकरोड विभागातील प्रभाग क्र. २२ (भागशः) व सातपूर विभागातील प्रभाग क्र. २४,२५,२६ (भागशः) परिसरातील पाणीपुरवठा बंद ठेवला जाणार आहे. तसेच रविवारी (दि.१०)ही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.