कोल्हापूर : गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची वाढतेय संख्या; निर्बीजीकरण प्रमाण वाढणार कधी? | पुढारी

कोल्हापूर : गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची वाढतेय संख्या; निर्बीजीकरण प्रमाण वाढणार कधी?

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्बीजीकरण हाच सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो; मात्र त्याकरीता निर्बीजीकरणाचे प्रमाण वाढणार कधी, असा सवाल आहे, त्याद़ृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. निर्बीजीकरणाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी असल्याने गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांत धास्ती वाढतच आहे.

रेबीजने युवतीचा मृत्यू झाल्यानंतर विविध संस्था, संघटना, राजकीय पक्षांकडून प्रशासनाला धारेवर धरले जात आहे; मात्र याकरिता सामूहिक प्रयत्न झाले तर भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव कमी करण्यात यश येणार आहे. शहरालगतच्या गावांतील कुत्र्यांचाही शहरी भागात उपद्रव वाढत आहे. ग्रामीण भागात निर्बीजीकरणाची यंत्रणा नाही आणि शहरातील कर्मचारी तेथे जाऊन ते काम करू शकत नाहीत, याकरिता धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

डॉक्टर, मनुष्यबळ वाढवण्याची गरज

संबंधित बातम्या

सध्या महापालिकेकडे तीनच डॉक्टर उपलब्ध आहेत. कुत्रे पकडणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही कमीच आहे. या विभागात नेमणूक केली की, ती रद्दसाठी प्रयत्न होत असल्याचीही काही उदाहरणे आहेत. यामुळे कुत्रे पकडण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करण्यातही अडचण येत आहे. या सर्वांचा परिणाम निर्बीजीकरणावर होत आहे. यामुळे उपाययोजना करण्याची गरज आहे.

श्रेयासाठी पोस्टरबाजी; नागरिकांच्या सुरक्षेचे काय?

विकासकामे आम्हीच केली, त्यासाठी इतका निधी आणला, अशी पोस्टर गल्लोगल्ली दिसत आहेत. या श्रेयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी खमके नेतृत्व असायलाच हवे, याबद्दल कुणाचे दुमतही नाही. शहरवासीयांच्या सुरक्षिततेसाठीही पुढे येण्याची गरज आहे. आरोप-प्रत्यारोप करून उपयोग नाही, पर्याय शोधले पाहिजेत व त्यांच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठबळ दिले पाहिजे.

शहरात पाच वर्षांत साडेसात हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण

शहरात 2019 पासून पाच वर्षांत साडेसात हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात आल्याचा महापालिका प्रशासनाचा दावा आहे. हे प्रमाण वाढवण्याची गरज आहे. सध्या शहरात मंगळवार पेठ आणि आयसोलेशन येथे दोनच केंद्रे आहेत. त्यांची संख्या आणि क्षमता वाढवण्याची गरज आहे.

Back to top button