नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यावरील अवकाळीचा फेरा कायम असून शनिवारी (दि. १५) पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने तडाखा दिला. नाशिक शहर, परिसराला सायंकाळी सुमारे पाऊण तास पावसाने झोडपून काढले, तर दिंडोरी, सटाणा, सिन्नर व निफाडमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. त्यामुळे कांदा, द्राक्ष, मका यांसह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. पुढील ३ दिवसांत जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये अवकाळीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
शहर व परिसरात दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी 5 च्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे शहरवासीयांचे हाल झाले. तसेच महापालिकेकडून विविध भागांमध्ये सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचे पितळ उघडे पडले. ठिकठिकाणी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमधील खड्ड्यांत पाणी साचल्याने तेथून मार्गक्रमण करताना वाहनचालकांची दमछाक झाली. दुसरीकडे पावसाने बत्तीगूल झाल्यामुळे शहरवासीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात रोष व्यक्त केला. दिंडोरी तालुक्यातील माेहाडी, खडकसुकेणे, कोराटे, म्हेळुस्के व कुर्णोली या गावांना सायंकाळी तासभर गारपिटीने तडाखा दिला. या भागांतील द्राक्षबागांसह गहू व कांद्याचे मोेठ्या प्रमाणात नुकसान झाले. बागलाणमधील मौजे तळवाडे दिगर, किकवारी खुर्द सह अंबासन व डागसौंदाणे येथेही गारपीट झाली. याशिवाय निफाड तालुक्यात पिंपळगाव बसवंतसह परिसरात काही ठिकाणी गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. चांदवड, सिन्नर, कळवण व अन्य तालुक्यांमध्येही अवकाळीच्या सरी बरसल्या. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, गहूसह द्राक्ष, टोमॅटो, भाजीपाला व अन्य पिकांचे मातेरे झाले आहे. त्यामूळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
– नाशिक शहरात वीजपुरवठा खंडित
– रस्त्यावरील छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचे हाल
– ग्रामीण भागात गहू, द्राक्ष, कांद्याला फटका
– हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने बळीराजा चिंतेत