संगमनेरला मध्यम, अकोल्यात जोर‘धार’ गारपीट! ‘अवकाळी’ने केली अवकळा | पुढारी

संगमनेरला मध्यम, अकोल्यात जोर‘धार’ गारपीट! ‘अवकाळी’ने केली अवकळा

संगमनेर/अकोले; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर व अकोले तालुक्यातील काही गावांना गारपिटीचा चांगला तडाका बसला. अकोले तालुक्यातील समशेरपुरसह टाहाकारी व सावरगाव पाट या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने टोमॅटो, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. संगमनेर व अकोले तालुक्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी गारपीट होऊन शेतकर्‍यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आज (शनिवारी) दुपारी 4 वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी, वडगावपान, समनापूर, निळवंडे, साकुर परिसरात काही अंशी गारपीट झाली. अवकाळीमुळे शेतातील कांदा, टोमॅटो, भाजीपाला व चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळ- वारा असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उमळून पडली. काही शेतकर्‍यांच्या घरांवरील पत्रे उडाली.

अकोले तालुक्यातील समशेरपूर, टाहाकारी, सावरगाव पाट या गावांमध्ये 4 वाजेच्या सुमारास वादळ, वार्‍यासह मोठ्या गारा पडण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्याकडेला व शेतामध्ये मोठ्या प्रमाणात गारांचा खच साचलेला आढळला.

बैलगाडा शर्यती रद्द कराव्या लागल्याने नाराजी..!
समशेरपूर गावामध्ये यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यत ठेवण्यात आली होती, मात्र शनिवारी दुपारी अचानक गारांचा जोरदार पाऊस झाल्यामुळे बैलगाडा शर्यत रद्द करण्याची वेळ ग्रामस्थांवर आल्याने सर्वांचा हिरमोड झाला.

Back to top button