File Photo
File Photo

नाशिक : धनादेश वटलाच नाही; भाजप पदाधिकाऱ्यास दंडासह कारावासाची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

स्क्रॅप मटेरियल खरेदी केल्यानंतर त्या मोबदल्यात दिलेले दोन धनादेश न वटल्या प्रकरणी भाजपचा पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे यास नाशिक न्यायालयाने तीन महिने कारावास आणि २९ लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे सहसचिव सार्जंट फुलचंद पाटील यांचे वूडन मटेरियल या नावाने स्क्रॅप मटेरियल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय त्यांचा मुलगा विकास पाटील सांभाळतात. २०१६ मध्ये आरोपी विक्रम नागरे याने पाटील यांच्या दुकानातून स्क्रॅप मटेरियल खरेदी केले होते. त्या मोबदल्यात नागरे याने १३ लाख व पाच लाख रुपयांचे दाेन धनादेश पाटील यांना दिले होते. दोन्ही धनादेश बँकेत न वटता परत आले. या प्रकरणी पाटील यांनी न्यायालयात खटला दाखल केला होता. त्यानुसार या खटल्यात पाटील यांच्या वतीने ॲड. बाबासाहेब ननावरे यांनी युक्तिवाद केला. अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी जी. एच. पाटील यांनी पुरावे असल्याने विक्रम नागरे यास दोषी ठरविले. दोन्ही खटल्यांत न्यायालयाने प्रत्येकी तीन महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच दोन्ही खटले मिळून २९ लाख रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रकमेपैकी २६ लाखांची रक्कम पाटील यांना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नागरे हा भाजपच्या उद्योग आघाडीचा पदाधिकारी असून, शासनाच्या शासकीय किमान वेतन कायदा सल्लागार मंडळाचा सदस्यही आहे.

हेही वाचा:

logo
Pudhari News
pudhari.news