मालेगाव : पुढारी वृत्तसेवा श्रीक्षेत्र चंदनपुरी येथे दर्शनासाठी आलेल्या चाळीसगाव तालुक्यातील भाविकांच्या वाहनाला परतीच्या प्रवासात अपघात झाला. त्यात चार भाविक दगावल्याची, तर १५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मालेगाव – चाळीसगाव मार्गावर गिगाव फाट्यावर आज (रविवार) सायंकाळच्या सुमारास हा अपघात झाला.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील मुंडखेडा या गावातील साधारण ४० भाविक टेम्पोने (Mh19 bm 0102 ) चंदनपुरी येथे कोटम कार्यक्रमासाठी आले होते. खंडोबाचे दर्शन घेऊन माघारी जात असताना गिगावजवळ हा ब्रेकफेल झाल्याने भरधाव वेगातील टेम्पो गतीरोधकावर उधळून पलटी झाला. तर अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने हा टेम्पो पलटल्याचीही चर्चा आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून खात्रीलायक माहिती मिळू शकली नाही.
टेम्पो पलटून एक वयोवृद्ध महिला व तीन भाविक जागीच ठार झाले. स्थानिकांनी मदतकार्य करुन जखमींना मालेगावच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठविले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मृतांची नावे
लिलाबाई पोपट पाटील ( 65)
कांतीलाल पोपट पाटील (48)
बन्सीलाल राघो पाटील (43)
आबाजी जालम पाटील (60)
सर्व राहणार मुंडखेडा (ता. चाळीसगाव) इतर जखमींवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.