नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
सिन्नर शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात आज (दि.13) बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून 17 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील दुर्घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दूर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली आहे.
तसेच नाशिक शिर्डी महामार्गावर झालेला खासगी बसचा अपघात अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. या दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींवर शासकीय खर्चाने वैद्यकीय उपचार केले जातील असे मुख्यमंत्र्यांनी जाहिर केले. तसेच या अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. दरम्यान मुख्यमंत्री नाशिकला अपघातस्थळी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक एम एच ०४ एसके 27 51) व शिर्डी बाजू कडून सिन्नर बाजूकडे जाणारा माल ट्रक (क्रमांक एम एच 48 टी 12 95) यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला. पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50 प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.