मुंबई; पुढारी वृत्तसेवा : नाशिक-शिर्डी महामार्गावर आज (शुक्रवार) पहाटे वावी पाथरे गावाजवळ बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात १० ठार आणि १७ जण जखमी झालेत. या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर शासकीय खर्चाने आवश्यक ते उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून या विषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आतापर्यंत दहाजण ठार झाले असून, काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत, तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.