नाशिक : जवानांच्या गौरवासाठी उभारली ‘सैनिक सन्मान बाग’

भोकणी : सैनिक सन्मान बागेत जवानांचा सन्मान करणारी कोनशीला आणि त्याजवळ नारळाच्या रोपाची करण्यात आलेली लागवड.
भोकणी : सैनिक सन्मान बागेत जवानांचा सन्मान करणारी कोनशीला आणि त्याजवळ नारळाच्या रोपाची करण्यात आलेली लागवड.
Published on
Updated on

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्यातील शहीद झालेल्या जवानांसोबतच गावात लष्करातून सेवानिवृत्त झालेले जवान आणि सध्या कार्यरत असलेले जवान अशा एकूण 33 कोनशीला… प्रत्येक कोनशीलेजवळ एका नारळाच्या रोपाची लागवड… गावातील तरुण पर्यावरण दूतांनी बागेची निगराणी करण्याची घेतलेली जबाबदारी…हे अनोखे चित्र आहे. तालुक्यातील भोकणी गावात उभारलेल्या वैशिष्ट्यपूर्ण 'सैनिक सन्मान बाग' या संकल्पनेतील.

सरपंच अरुण वाघ यांच्या संकल्पनेतून ही सैनिक सन्मान बाग उभारण्यात आली आहे. जवानांचा सन्मान करणारी कोनशीला आणि त्याजवळ एका नारळाच्या रोपाची लागवड करण्यात आली आहे. बागेच्या निगराणीची जबाबदारी शिरावर घेतली गावातील पर्यावरणदूत तरुणांनी. ग्रामपंचायत मालकीचा आणि दुसरा ग्रामविकास मंचचा टँकर अशी सांगड घालून या सैनिक सन्मान बागेतील झाडांची निगा राखली जात आहे.  सैनिक सन्मान बागेत प्रत्येक कोनशीलेवर सैनिकाचे संपूर्ण नाव, सैन्यदलात कार्यरत  असल्याचा, निवृत्त झालेल्या तारखेचा उल्लेख करण्यात आला आहे.

तहसीलदार सुरेंद्र देशमुख, गटविकास अधिकारी अशोक भवारी, वनपरिक्षेत्र अधिकारी निलेश पाटील, वावी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार यांच्या हस्ते नुकतेच सैनिक सन्मान बागेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. तसेच शहिद जवानांच्या वीरमाता, वीरपत्नी, निवृत्त सैनिक, लष्करात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

सेवानिवृत्त आणि कार्यरत जवानांचा सन्मान
गावातील निवृत्त जवान चिंतामण सानप, सोमनाथ दराडे, भिवाजी कुर्‍हाडे, सुरेश सांगळे, रवींद्र साबळे, सैन्यदलात कार्यरत असलेले सतीश साबळे, गोरख कुर्‍हाडे, महेश पानसरे, सौरभ सानप, मुकेश सानप, सचिन इलग, विष्णु सानप, गणेश बांगर, शरद सांगळे, अमोल डावखर, अरुण सानप, दिनेश सानप, सागर सानप, सागर कुर्‍हाडे, कृष्णा सानप यांच्या नावाच्या कोनशीला उभारण्यात आल्या आहेत.

रणगाड्याची प्रतिकृती ठरतेय आकर्षण
दुचाकी, चार चाकी वाहनांचे अडगळीत पडलेले टायर्स एकत्र करून त्या माध्यमाातून सैनिक सन्मान बागेत रणगाड्याची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. त्यावर लष्करी पेंटिंग केल्याने गावातील तरुणांसाठी हा सेल्फी पॉईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

या सैनिकांच्या नावाने उभारल्या कोनशीला
तालुक्यात आतापर्यंत 9 जवान शहीद झाले आहेत. त्यात वसंत लहाने, केशव गोसावी, संदीप ठोक, श्रीकांत बोडके, नंदू पाटसकर,
राकेश आणेराव, रितेश सानप, सुदाम दराडे, शंकर गोसावी यांचा समावेश आहे. या शहिदांच्या नावाने सैनिक सन्मान बागेत कोनशीला
उभारण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news