जुने नाशिक, पुढारी वृत्तसेवा : सारडा सर्कल येथील दारू दुकान त्वरित बंद करावे, या मागणीसाठी मंगळवारी (दि.२७) सकाळी शिवसेना ठाकरे गटाच्या रणरागिणींनी मोर्चा काढला. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्य नाशिक विधानसभा प्रमुख बाळासाहेब कोकणे व माजी नगरसेवक मुशीर सैय्यद यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात युवा नेत्या अदिना सय्यद यांच्यासह शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.
'दारू दुकान बंद करा' अशा आंदोलकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनात हेमलता जुन्नरे, शोभा दोंदे, शोभा पवार, स्वाती पाटील, कल्पना पिंगळे, फैमिदा रंगरेज, निलोफर शेख, सचिन बांडे, ऋषी वर्मा, संजय गायकर, सुभाष शेजवळ, संजय परदेशी, पप्पू टीळे, कामरान सय्यद, करण लोणारी, सरप्रीत बल, रियाज बागवान, दत्ता दंडगव्हाण, झुल्फेकर शेख, कमलेश परदेशी, मुश्ताक तांबोळी, राजेंद्र क्षीरसागर, गुलाम सय्यद, दस्तगीर पानसरे आदींसह स्थानिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
दारू विक्री केंद्रापासून काही अंतरावर शंभर वर्षे जुनी ऐतिहासिक नॅशनल उर्दू शाळा व कॉलेज आहे. त्यामध्ये शिक्षण घेणारे साधारणतः दहा हजार विद्यार्थी आहेत. त्यांच्या बालमनावर परिणाम होऊन शैक्षणिक प्रगती खुंटणार व विद्यार्थी व्यसनाधीन होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. येथे काही मद्यपी मुलींची छेडछाड करतात. त्यामुळे काहीही विचित्र घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. दारू दुकानाच्या जवळच दोन मंदिरे व दोन दर्गा आहेत. हा भाग दाट लोकवस्तीचा असल्याने अनेक लोक व्यसनाधीन होऊन कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकतात. म्हणून अशा ठिकाणी दारू दुकान चालू देणार नाही, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदन देण्यात आले आहे. महिला व नागरिकांनी देशी दारूचे दुकान बंद करण्याच्या घोषणा देत हाती फलक घेऊन दारू दुकानापर्यंत मोर्चा काढला.
सारडा सर्कल वरील दारू दुकान बंद करण्यासंदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. कारण या परिसरात विविध धार्मिक स्थळे व ऐतिहासिक शैक्षणिक संस्थान असल्यामुळे हजारो मुले मुली रोज येजा करीत असतात. दारू दुकान सुरु झाल्यापासून स्थानिक नागरिक हैराण झाले असून ही दुकान त्वरित बंद करण्यात यावी. दहा दिवसात दुकान बंद ना झाल्यास तीव्र आंदोलन करू. – अदीना सय्यद, युवा नेत्या, शिवसेना ठाकरे गट