ओझर : पुढारी वृत्तसेवा
मविप्र संस्थेच्या ओझर येथील महाविद्यालयाचा विद्यार्थी शुभम भंडारे याने ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करीत नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे.
दि. १३ ते १६ मार्चदरम्यान चेन्नई येथे पार पडलेल्या ऑल इंडिया इंटरयुनिव्हर्सिटी ॲथलेटिक्स स्पर्धेत ३००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात शुभमने ८ मिनिटे ४७ सेकंद ही वेळ नोंदवत नवीन राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत सुवर्णपदक पटकाविले. यापूर्वी हरियाणाच्या खेळाडूची विक्रमाची सर्वोत्तम वेळ ही ८ मिनिटे ५१ सेकंद इतकी होती. शुभमने तो विक्रम मोडून ऐतिहासिक कामगिरी केली. त्यामुळे तो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा व महाराष्ट्राचा एकमेव खेळाडू ठरला आहे. तसेच मे २०२३ ला उत्तर प्रदेश येथे होणाऱ्या खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी त्याची निवड झाली आहे. शुभमचे स्टीपल चेस स्पर्धेतील वर्षभरातील हे चौथे सुवर्णपदक आहे. या देदीप्यमान यशाबद्दल शुभमचे मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, अध्यक्ष डॉ. सुनील ढिकले, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, निफाड तालुका संचालक शिवाजी गडाख, महिला संचालक शोभा बोरस्ते, शिक्षण अधिकारी डॉ. नितीन जाधव, डॉ. भास्कर ढोके, डॉ. आर. डी. दरेकर, डॉ. डी. डी. लोखंडे, प्रा. डी. डी. जाधव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी. आर. भदाणे, क्रीडा संचालक डॉ. दीपक सौदागर आदींनी अभिनंदन केले.