Nashik News : डेंग्यू प्रकरणी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस

Nashik News : डेंग्यू प्रकरणी नाशिकरोड रेल्वेस्थानक प्रबंधकांना नोटीस
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाल्यावर बेकायदेशीर बांध घालत डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण केल्याचा ठपका ठेवत नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. डेंग्यू प्रकरणी महापालिकेने आतापर्यंत १०५८ नागरिक तसेच शासकीय, खासगी आस्थापनांवर कारवाई केली आहे. बांधकामांच्या साईटस‌् डेंग्यूची उत्पत्तीस्थाने ठरत असल्याने बांधकाम परवानग्यांची माहितीही वैद्यकीय विभागाने नगररचना विभागाकडून मागविली आहे.

नाशिक शहरात यंदा डेंग्यूने थैमान घातले आहे. पावसाळा संपल्यानंतरही डेंग्यूचा प्रादुर्भाव कायम राहिला आहे. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूच्या तब्बल १९३ नवीन बाधितांची नोंद झाली होती, तर डेंग्यूच्या तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे आरोग्य उपसंचालक कपिल आहेर यांच्या अध्यक्षतेखालील साथरोग मृत्यू संशोधन समितीची महापालिकेची कानउघाडणी केली. डेंग्यू नियंत्रणासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही समितीने केल्या. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये बळींचा आकडा कमी होणे अपेक्षित होते. पंरतु, नोव्हेंबरमध्ये तब्बल २७२ नवीन रुग्णांची भर पडली आहे. त्यात आता दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने बळींचा आकडा तीनवर गेला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभाग अॅलर्ट मोडवर आला असून, डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांच्या उत्पत्तीस्थानांचा शोध सुरू केला आहे. त्यात नाशिकरोड विभागातील गोसावीवाडी परीसरातून जाणाऱ्या सांडपाण्याच्या नाल्यावर रेल्वे विभागाने तीन ठिकाणी बंधारे बांधले आहेत. बंधाऱ्यांत साचलेल्या पाण्यात डेंग्यूचा फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महापालिकेने नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या प्रबंधकांना नोटीस बजावली आहे.

१०५८ नागरिक, आस्थापनांना नोटिसा

डेंग्यू आजाराच्या फैलावास कारणीभूत ठरणाऱ्या 'एडीस इजिप्ती' प्रजातीच्या डासांची उत्पत्तीस्थाने शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. आठ दिवसांपेक्षा अधिक काळ साचलेल्या स्वच्छ पाण्यातच या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे मलेरिया पथकाने घरोघरी तपासणी मोहिम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आलेल्या १०५८ नागरीक, शासकीय तसेच खासगी कार्यालयांना महापालिकेने नोटीसा बजावत दंडात्मक कारवाई केली आहे.

बांध घालून नाल्याचे पाणी अडवत त्यात डेंग्यू आजारास कारणीभूत ठरणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने निर्माण करण्यास कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत नाशिकरोड रेल्वे स्थानक प्रबंधकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शहरातील अर्धवट बांधकाम प्रकल्पांची माहिती नगररचना विभागाकडून मागविण्यात आली आहे.

-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभागप्रमुख

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news