Pune News : नगर रस्त्यावरील बीआरटीवर हातोडा | पुढारी

Pune News : नगर रस्त्यावरील बीआरटीवर हातोडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आणि अपघात रोखण्यासाठी येरवडा ते विमाननगर दरम्यानचा बीआरटी मार्ग बुधवारी रात्री उशिरा महापालिकेकडून काढण्यात आला. गोखले संस्थेने दिलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. महापालिकेकडून नगर रस्त्यावर येरवडा ते खराडीपर्यंत बीआरटी योजना राबविण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत या भागात झालेले नागरीकरण, आयटी कंपन्या आणि वाढलेली वाहने त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला होता.

त्यातच बीआरटी मार्गात सातत्याने अपघातांच्या घटना घडत असल्याने हा बीआरटी मार्ग काढून टाकण्यात यावा, या मागणीने जोर धरला होता. वाहतूक पोलिसांनी बीआरटी काढण्याबाबत महापालिकेला पत्र दिले होते. मात्र, पीएमपीने त्यास विरोध दर्शविला होता. दरम्यान वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी गतवर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न उपस्थित करून बीआरटी हटविण्याची मागणी केली होती. त्यासाठी महापालिकेकडे त्यांनी पाठपुरावा केला होता. अखेर महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबत निर्णय घेण्यासाठी गोखले संस्थेची नेमणूक केली होती.

या संस्थेने पुणे-नगर महामार्गावरील पर्णकुटी, येरवडा ते फिनिक्स मॅाल, विमाननगर या टप्प्यातील मेट्रो कामामुळे बंद पडलेला बीआरटी मार्ग काढण्याचा अहवाल महापालिकेला नुकताच दिला. त्यानुसार वारंवार होणारे अपघात, वाहतूक पोलिसांनी केलेली सूचना, स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संघटना तसेच नागरिकांची मागणी लक्षात घेता येरवडा ते विमाननगर टप्प्यातील बीआरटीचे तुटलेले रेलिंग आणि मेट्रो कामामुळे चालू करता न येणारे धोकादायक अवशेष काढण्याचे काम पुणे महापालिकेने बुधवारी रात्री चालू केले असल्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकने यांनी सांगितले. त्यामुळे आता किमान येरवडा ते विमाननगरपर्यंतच्या मार्गांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे.

हेही वाचा

Back to top button