Nashik News| केतकी म्हणते.. नाशिककर मोगऱ्यासारखे ! विविधरंगी फुलांनी महापालिका बहरली

Nashik News| केतकी म्हणते.. नाशिककर मोगऱ्यासारखे ! विविधरंगी फुलांनी महापालिका बहरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-नाशिक खुपच सुंदर आहे. नाशिककरांमध्ये प्रेम, जिव्हाळा आहे. अंकुश चित्रपटाच्या शुटींगच्या निमित्ताने नाशिकमध्ये मी महिनाभर राहिले आहे. येथील लोकांचे प्रेम मी अनुभवले आहे. नाशिक शहर फुल असते तर मी नाशिकला मोगऱ्याची उपमा दिली असती, अशा शब्दांत सिनेअभिनेत्री तथा गायिका केतकी माटेगांवकर यांनी नाशिककरांशी संवाद साधला. महापालिका मुख्यालय राजीव गांधी भवनात आयोजित तीन दिवसीय 'पुष्पोत्सव २०२४'चे उद‌्घाटन शुक्रवारी(दि.९) माटेगांवकर हिच्या हस्ते झाले. विविधरंगी फुलांनी महापालिका मुख्यालय बहरले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. अॅड. राहुल ढिकले, आ. प्रा. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर होते. आर. जे. प्रथम याने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना केतकीने पुष्पोत्सव प्रेरणादायी असल्याचे सांगत पुष्पप्रेमी नाशिककरांचे तोंड भरून कौतुक केले. तिने आपल्या अल्बममधील 'भास हा नवा नवा..' तसेच टाईमपास चित्रपटातील 'मला वेड लागले प्रेमाचे..' हे गीत सादर करत नाशिककरांची मनं जिंकली. आ. राहुल ढिकले यांनी पुष्पोत्सवामुळे नाशिककरांना पर्यावरण संवर्धनाचे तसेच वृक्षलागवडीचे प्रोत्साहन मिळत असल्याचे नमूद करत उद्यान अधीक्षक विवेक भदाणे यांच्या नियुक्तीनंतर उद्यान विभागाच्या कामकाजाला दिशा मिळाल्याचे गौरवोद्गार काढले. महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी आयोजित केला जाणारा पुष्पोत्सव नाशिककरांसाठी मेजवाणीच असल्याचे आ. सीमा हिरे यांनी सांगितले. आयुष्यात झाडे, फुले, फुळे यांना अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सांगत आ. देवयानी फरांदे यांनी शहरातील उद्यानांच्या देखभालीकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरूवात पुष्पदिंडीच्या पुजनाने झाली. अतिरीक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांनी प्रास्तविकात पुष्पोत्सवाच्या आयोजनाचे महत्त्व विशद केले. सूत्रसंचालन मिलिंद राजगुरू, योगेश कमोद यांनी केले तर नाना साळवे यांनी आभार मानले. कार्यकारी अभियंता रवी बागुल यांनीही यावेळी गीत सादर केले.

आरूष काळे यांनी पटकावली 'गुलाब राजा'ची ट्रॉफी

पुष्पोत्सवाच्या निमित्ताने विविध गटात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. गुलाब राजाची मानाची ट्रॉफी आरुष काळे यांनी तर गुलाब राणीची ट्रॉफी माधुरी धात्रक यांनी पटकावली. परिसर प्रतिकृतीत नाशिक पूर्व विभागाने प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय सर्वोत्कृष्ठ तबक उद्यान- ज्योती पाटील, सर्वोत्तम परिसर प्रतिकृती- प्रसाद नर्सरी, पुष्परांगोळी- पंकजा जोशी, जपानी पुष्परचना(इकेबाना)- स्वप्नाली जडे, ताज्या फुलांची पुष्परचना- स्वप्नाली जडे, सर्वोत्तम बोन्साय- विनायक शिंदे, सर्वोत्तम कुंड्यांची शोभिवंत नर्सरी- प्रसाद नर्सरी, उत्कृष्ठ नर्सरी -पपया नर्सरी.

नाशिककरांसाठी पुष्पोत्सव खुले

शुक्रवारी पुष्पोत्सवाचे उद‌्घाटन झाल्यानंतर शनिवारी(दि.१०) व रविवारी(दि.११) सकाळी ९ ते रात्री ९ यावेळेत हे पुष्पप्रदर्शन नाशिककरांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. फुलांची आकर्षक कमान, प्रांगणातील सेल्फी पॉइंट, मिनीएचर लॅन्डस्केपींग, कार्यालयाच्या तिन्ही मजल्यावरील विविध गटांची मांडणी, पुष्परचना, गुलाबपुष्पे, मोसमी फुले, फळे, भाजीपाला, हार, बुके, बोन्साय, कॅक्टस‌्, शोभिवंत कुंड्या, नर्सरी व विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पुष्पोत्सवाचे मुख्य आकर्षण आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवाणी

पुष्पोत्सवाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी आयोजित करण्यात आली आहे. उद्घाटन सत्रानंतर स्वरसंगीत हा कार्यक्रम पार पडला. शनिवारी सकाळच्या सत्रात निसर्ग व फुलांवर आधारीत कवित्रा सत्र, सायंकाळी संगीत संध्या तर रविवारी सिनेअभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके वाटप करून पुष्पोत्सवाचा समारोप केला जाणार आहे.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news