नाशिक : पुढारी वृत्तसेवा- ठेकेदाराने बुडवलेले वाहकांच्या पीएफचे थकीत एक कोटी रुपये सिटीलिंक प्रशासनाने भरूनही वाहकांनी पुकारलेला संप शनिवारी (दि.१६) तिसऱ्या दिवशीही कायम आहे. पीएफची अडीच कोटींची संपूर्ण थकबाकी जोपर्यंत भरली जात नाही तोपर्यंत संप मागे न घेण्याची भूमिका वाहकांनी घेतल्यामुळे या संपावर तोडगा निघू शकला नाही. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी तपोवन व काही प्रमाणात नाशिकरोड डेपोतील २४७५ बसफेऱ्या सिटीलिंकला रद्द कराव्या लागल्या असून, सिटीलिंकचा सुमारे ७० लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. तर प्रवाशांचेही या संपामुळे अतोनात हाल होत आहेत.
'मॅक्स डिटेक्टीव्हज अॅण्ड सिक्युरिटीज' या दिल्लीस्थित वाहक पुरवठादार कंपनीच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे सिटीलिंकला गेल्या दोन वर्षात तब्बल नवव्यांदा संपाला सामोरे जावे लागले आहे. वाहकांना नियमित वेतन अदा करण्याची जबाबदारी या ठेकेदाराची असताना महापालिकेने डिसेंबर महिन्याचे वेतन आगाऊ स्वरूपात अदा करूनही ठेकेदाराने वाहकांना ते दिले नाही. वाहकांच्या पीएफ व एएसआयसीचा निधीही जमा केला नाही. त्यामुळे वाहकांनी गुरूवार(दि.१४)पासून संप पुकारल्याने सिटीलिंकची बससेवा ठप्प झाली.
सिटीलिंक व्यवस्थापनाने वाहक पुरवठादार व संपकरी वाहकांच्या प्रतिनिधींसमवेत संयुक्त बैठका घेत तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. दिल्लीस्थित वाहक पुरवठादार कंपनीचे संचालक अनिल कुमार यांना पाचारण करण्यात आले. परंतु मूळ ठेकेदाराने समजूत काढूनही पोट ठेकेदार असलेल्या स्थानिक वाहकपुरवठादाराने एेकले नाही. त्यामुळे संपावर तोडगा निघू शकला नाही. ठेकेदाराने जबाबदारी न पाळल्याने अखेर बससेवा सुरू करण्यासाठी शुक्रवारी(दि.१५) सिटीलिंकने पीएफच्या थकबाकीपोटी एक कोटी रुपये आगाऊ भरले. मात्र त्यानंतरही वाहक संपाच्या भूमिकेवर ठाम राहिले. उर्वरित अडीच कोटी रुपयांची थकबाकी जमा करण्याची आग्रही मागणी या संपकऱ्यांकडून केली गेल्यानंतर सिटीलिंक प्रशासनाने हतबलता दर्शविली. परिणामी शनिवारी(दि.१६) सलग तिसऱ्या दिवशी शहर बससेवा सुरू होऊ शकली नाही. तपोवनातील सर्वच १५० बसेस डेपोतच उभ्या होत्या. तर नाशिकरोड डेपोतील युनिटी या दुसऱ्या वाहक पुरवठादाराकडील वाहकांच्या जोरावर जेमतेम ३५ बसेस रस्त्यावर उतरू शकल्या.
हेही वाचा :