उपोषण मागे; आ. नीलेश लंकेंची मध्यस्थी : चौपदरीकरणासाठी प्रांताधिकारी नियुक्त | पुढारी

उपोषण मागे; आ. नीलेश लंकेंची मध्यस्थी : चौपदरीकरणासाठी प्रांताधिकारी नियुक्त

वाडेगव्हाण : पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण येथील प्रलंबित चौपदरीकरणाचे काम मार्गी लागण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून तातडीने प्रांताधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर सचिन शेळकेंसह ग्रामस्थांनी पाचव्या दिवशी उपोषण मागे घेतले. गावात चौपदरीकरणाचे काम रखडल्याने महामार्गावर अपघातांची मालिका सुरू आहे. वाहनांची वाढती संख्या व अरुंद रस्ता, यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून महामार्गावरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे सचिन शेळके याच्यांसह ग्रामस्थांनी 11 मार्चपासून रोजी गावात उपोषण सुरू केले होते. गावातील रस्त्याचे 945 पैकी 815 मीटरचे काम करण्यात आले.

परंतु, उर्वरित 130 मीटर काम प्रलंबित आहे. या रस्त्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आला होता. परंतु, रस्त्याचा प्रस्तावात त्रूटी असल्याचे भूसंपादन विभागाकडून सांगण्यात येत होते. त्यामुळे तिढा सुटत नव्हता. उपोषणाची तीव्रता लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने प्रस्तावात दुरुस्त्या करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दिला. परंतु, प्रशासनाकडून वेळकाढूपणा सुरूच होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमि अभिलेख कार्यालयाकडे सदर रस्त्याच्या मोजणीची फी जमा केली होती. परंतु, प्रस्तावाच्या अनुपलब्धतेमुळे सदर रस्त्याची मोजणी रेंगाळली होती.

आंदोलकांनी मोजणी व भूसंपादनासाठी सक्षम अधिकार्‍याची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत प्रस्ताव भूमि अभिलेखला द्यावा व महामार्गावरील संपादित होणार्‍या क्षेत्राचा योग्य मोबदला ग्रामस्थांना देण्यात यावा, यासाठी आग्रही भूमिका ठेवली होती. आंदोलनकर्त्यांची प्रकृती ढासळत असताना ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत प्रशासनाचा निषेध केला. आंदोलनस्थळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, भाजपा तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, मनसे नेते अविनाश पवार, यांच्यासह विविध पदाधिकार्‍यांनी भेटी देवून आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. सचिन शेळके यांनी रस्त्याच्या मोजणीची तारीख मिळावी, यासाठी आग्रह धरला होता.

काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे मार्ग निघत नव्हता. भर उन्हात सुरू असलेल्या उपोषणाला 5 दिवस उलटूनही कार्यवाही होत नव्हती. आमदार नीलेश लंके यांनी संबंधित विभागांशी संपर्क साधत परिस्थितीचे गांभिर्य निदर्शनास आणून दिले. त्यांनतर अधिकार्‍यांनी तातडीने प्रस्तावाच्या दुरुस्त्या केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून तातडीने प्रांतधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर सचिन शेळके यांनी उपोषण मागे घेतले. यावेळी उपसरपंच राजेश शेळके, सरपंच मनिषा जाधव, चेअरमन बाळासाहेब चव्हाण, दादासाहेब शेळके, तानाजी पवळे, रामदास जाधव,गणेश शेळके, अर्जून वाल्हेकर, लक्ष्मण शेळके, संपत जाधव, धोंडीबा गायकवाड, हौसिराम कुदळे, सचिन शेळके, उपविभगीय अधिकारी संजय भावसार यांच्यासह महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आमदार नीलेश लंके यांची मध्यस्थी

आमदार नीलेश लंके यांनी उपोषण स्थळी भेट देवून सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी, बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून काला म्हणून प्रांताधिकारी यांची नियुक्ती झाली. त्यानंतर सचिन शेळके व ग्रामस्थांनी आमदार लंके व शरद पवळे यांच्या हस्ते लिंबू सरबत देवून उपोषण सोडले.

हेही वाचा

Back to top button