नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी तसेच अयोध्येतील राममंदिराच्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे व राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज, पर्यटन मंत्री गिरीश महाजन मंगळवारी (दि. ९) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते श्री काळाराम मंदिरात महाआरती करणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारीच्या दौऱ्यासाठी पक्षीय तयारी, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुपर वॉरिअर्सची बैठक तसेच राममंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी नाशिकमधून तयारीचा आढावा घेणार आहेत.
लोकसभा निवडणूक येत्या एप्रिल-मे मध्ये होत आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपने यात मोठी आघाडी घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून अयोध्येत २२ जानेवारीला होणारा राममंदिर उद्घाटन सोहळा भाजपने प्रतिष्ठेचा केला आहे. त्यातून श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीला महत्त्व आले आहे. त्यातच राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी येत्या १२ जानेवारी रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत.
पंतप्रधानांच्या या दौऱ्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे बिगूल वाजणार आहे. या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. त्यांच्या हस्ते मंगळवारी सकाळी ११ वाजता पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाआरती होईल. त्यानंतर तेथूनच २२ जानेवारीला अयोध्येत होणाऱ्या राममंदिर उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या दिवशी महादिवाळी साजरी करावी, घरोघरी दिवे लावून रोषणाई करावी, घरापुढे रांगोळ्या काढाव्यात व घरांची सजावट करावी या विविध विषयांवर ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती नाशिक शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांनी दिली.
लोकसभा कोअर कमिटीची बैठक
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, मंत्री गिरीष महाजन, प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी, प्रदेश कार्यालय प्रभारी तथा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रवी अनासपुरे, स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत दुपारी १२ ते १.३० या कालावधीत नाशिक, दिंडोरी, शिर्डी, अहमदनगर येथील लोकसभा कोअर कमिटी बैठक स्वामी नारायण बॅक्वेट हॉल, आडगांव नाका, पंचवटी येथे होणार आहे. दुपारी २ ते ४ या कालावधीत नाशिक लोकसभा व दिंडोरी लोकसभेतील १२ विधानसभेच्या सुपर बुथ वॉरियर्स संवाद बैठक लंडन पॅलेस हॉल, आडगांव नाका येथे होणार आहे. तसेच दुपारी ४ वाजता भाजपा वसंतस्मृती कार्यालय येथे विविध पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा भाजपात प्रवेश सोहळा होणार आहे.
हेही वाचा ;