नाशिक : पुढारी वृत्तसेवा; राज्यपाल रमेश बैस हे गुरुवारी (दि.१२) नाशिकमध्ये येत असून या दौऱ्यात ते विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत. त्याच दिवशी सर्व आदिवासी संघटनांनी निरनिराळ्या मागण्यांच्या अनुषंगाने माेर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यपाल दाैरा आणि मोर्चा अशा दोन्ही बाबी एकाच दिवशी येत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. (Nashik News)
राज्याची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपाल बैस हे नाशिकच्या दाैऱ्यावर येत आहेत. या प्रसंगी राज्यपाल बैस हे महाराष्ट्र आराेग्य विज्ञान विद्यापीठाला भेट देत पाहाणी करणार आहेत. तर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये ते बैठका घेणार आहेत. या बैठकांमध्ये केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना, वनहक्क दावे, आरोग्य योजना, संजय गांधी निराधारसह अन्य योजनांसंदर्भात आढावा घेतील. त्यामुळे या दौऱ्यात कोणतीही कमतरता भासणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासनाने सुक्ष्म तयारीवर भर दिला आहे. (Nashik News)
राज्यपालांच्या दौऱ्यासाठी यंत्रणा कामात गुंतल्या असताना दौऱ्याच्या दिवशी नाशिक शहरामध्ये आदिवासी बांधवांनी उलगुलान मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चामध्ये सर्व आदिवासी संघटना सहभागी होणार आहेत. पेठ, सुरगाणा, कळवण, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर व इगतपूरीसह अन्य तालूक्यातून आदिवासी बांधव यानिमित्ताने मिळेल त्या मार्गाने व वाहनाने नाशिकमध्ये धडक देणार आहेत. तपोवन ते जिल्हाधिकारी कार्यालय येथे समारोप होणार आहे. मोर्चासाठी पेठ, सुरगाणा, दिंडोरी तसेच कळवणकडून येणारे आंदोलक आरोग्य विज्ञान विद्यापीठ येथे एकत्रित जमणार आहेत. त्याचवेळी राज्यपालदेखील आरोग्य विद्यापीठात दाखल होणार आहेत. त्यामुळे आंदोलकांकडून तेथे आंदोलन केले जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभुमीवर मोर्चाला सामाेरे जाताना राज्यपालांचा दौरा सुरळीत पार पाडण्याची दुहेरी कसरत पार पाडावी लागणार असल्याने प्रशासनापुढे संकट ऊभे ठाकले आहे.
या आहेत मागण्या
आदिवासी बांधवांतर्फे विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार आहे. धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करू नये ही प्रमुख मागणी आहे. आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावू नये, राज्यात दीड लाख नोकरदारांनी बोगस जातीच्या दाखल्यांच्या आधारे नोकऱ्या मिळविल्या असून आदिवासींना त्यांचा हक्क मिळवून द्यावा. नोकऱ्यांचे कंत्राटीकरण थांबवावे, या मागण्यांसाठी हे आंदोलन होते आहे केले जाणार आहे.
हेही वाचा :