बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे खेडे, बाहेरील लोक येण्यासही कचरतात, विवाह होण्यासही अडचणी | पुढारी

बिहारमध्ये पाकिस्तान नावाचे खेडे, बाहेरील लोक येण्यासही कचरतात, विवाह होण्यासही अडचणी

पुर्णिया : आपल्याच भारत देशात पाकिस्तान नावाचे एक खेडे आहे, असे सांगितले तर क्षणभर विश्वास देखील बसणार नाही. मात्र, बिहारमधील पुणिर्र्या जिल्ह्यात सिंधिया पंचायतीत पाकिस्तान नावाचे एक खेडे वसलेले असून तेथे फक्त आदिवासी समाजाची वस्ती आहे. फाळणीनंतर येथील मुस्लिम नागरिक पूर्व पाकिस्तानात म्हणजे सध्याच्या बांगलादेशमध्ये स्थलांतरित झाले. त्याची आठवण म्हणून या गावाचे नाव पाकिस्तान असे ठेवले गेले. मात्र, सध्या तेथील स्थानिकांना हे नावच आता अडचणीचे ठरत आले आहे.

पुर्णियापासून 35 किलोमीटर अंतरावर हे गाव वसलेले आहे. आता गावाचे नावच पाकिस्तान असल्याने येथे बाहेरील लोक येण्यासही कचरतात. काही जण तर येण्यासही तयार असत नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे की, या गावात येण्यासाठी पक्का रस्ताही नाही. खाचखळगे व पायवाटांमधून मार्ग काढतच इथवर यावे लागते.

या गावात फक्त आदिवासी लोक राहतात. त्या लोकांच्या आधार कार्डावर पाकिस्तान असा उल्लेख येत असल्याने त्यांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. पाकिस्तान नाव असल्याने या खेड्यातील विवाह होण्यासही अडचणी येतात. स्थानिक पंचायतीने या सार्‍यावर मार्ग काढण्यासाठी गावाचे नाव बदलावे, अशी विनंती प्रशासनाकडे केली होती. पण, त्याचा अद्याप विचार झालेला नाही.

Back to top button