Nashik Lok Sabha 2024 : साधू, महंतांना लोकसभेचा लळा, निवडणूकीच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री

Nashik Lok Sabha 2024 : साधू, महंतांना लोकसभेचा लळा, निवडणूकीच्या रिंगणात आता नव्या महंतांची एंट्री
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- धार्मिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अन् सिंहस्थ, कुंभमेळ्यामुळे जगभरात लौकीक असलेल्या नाशिकच्या खासदारकीचे आकर्षण केवळ राजकारण्यांनाच नसून, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांना देखील आहे. नाशिकच्या जागा कोणत्या राजकीय पक्षाच्या पारड्यात पडेल, हा तिढा अजूनही कायम असला तरी, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांनी मात्र आपल्या उमेदवारीची घोषणा करून प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. आतापर्यंत महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, स्वामी कंठानंद व अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी लोकसभेचे रणशिंग फुंकले आहे. आता श्रीराम शक्तिपीठ आश्रमाचे सचिव तथा महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वरानंद महाराजांचे शिष्य महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे देखील निवडणूकीच्या आखाड्यात उतरल्याने नाशिक लोकसभा निवडणूकीत चूरस वाढण्याची शक्यता आहे. (Nashik Lok Sabha 2024)

आगामी कुंभमेळा लक्षात घेता, नाशिकच्या खासदारकीची माळ गळ्यात पाडून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. आतापर्यंत नाशिक लोकसभा निवडणूकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून अनेकांची नावे पुढे आली आहेत. मात्र, एकाच्याही नावावर एकमत न झाल्याने, नाशिकच्या जागेचा तिढा कायम आहे. दुसरीकडे निवडणूकीचा बिगुल वाजल्यापासून धार्मिक क्षेत्रातील साधू, महंतांनी आपल्या नावांची घोषणा करून प्रचाराचा श्रीगणेशाही केला आहे. महंत कंठानंद महाराज, महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज, अनिकेत शास्त्री देशपांडे यांनी यापूर्वीच नाशिक लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी दोघांनीही भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी श्रेष्ठींच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांनी तर भाजपसह, महाविकास आघाडी आणि मनसेचीही चाचपणी केली आहे. त्यांचे नाव अजूनही भाजप, ठाकरे गट अन् मनसे पक्षाकडून चर्चेत आहे. विशेष म्हणजे या पक्षांनी तिकिट न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे यापूर्वीच या दोघांनी स्पष्ट केले आहे. (Nashik Lok Sabha 2024)

आता महंत सिद्धेश्वरानंद सरस्वती यांनी देखील आपली उमेदवारी जाहीर केली असून, ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे. श्रीराम शक्तिपीठाच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची माहिती ते मतदारांपर्यंत पोहोचविणार आहेत. दरम्यान, राजकीय पक्षांच्या उमेदवारांचा तिढा कायम असला तरी, धार्मिक क्षेत्रातील संत, महंतांनी आपल्या उमेदवाऱ्या जाहीर केल्याने, नाशिक लोकसभा मतदार संघाची निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट आहे.

कुंभमेळ्यात खासदाराची भूमिका

नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे २०२६-२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिकच्या खासदाराची भूमिका महत्त्वपूर्ण असते. सिंहस्थाचे नियोजन, अंमलबजावणी, देशभरातून येणाऱ्या साधू-महंतांचे आदरातिथ्य या सर्वांची जबाबदारी लोकप्रतिनिधींच्या खाद्यांवर असते. याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गठीत केलेल्या समित्यांवर देखील खासदाराला स्थान असते. निधी वाटप असो वा नाशिक, त्र्यंबकेश्वरमधील विकासकामे असो यात खासदाराची भूमिका महत्त्वपूर्ण असते. जगातील सर्वात मोठा धार्मिक उत्सव असल्याने, नाशिकच्या खासदारपदी धार्मिक क्षेत्रातीलच उमेदवार असावा, हा विचार पुढे ठेवून निवडणूकीच्या आखाड्यात धार्मिक क्षेत्रातील संत, महंत उडी घेताना दिसून येत आहेत.

२००९ च्या निवडणूकीत महंत

नाशिक लोकसभा मतदार संघावर यापूर्वी देखील संत, महंतांनी दावेदारी केली आहे. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत महंत सुधीरदास पुजारी हे बहुजन समाज पक्षातर्फे निवडणूकीच्या रिंगणात होते. त्यावेळी बसपाचा सोशल इंजिनिअरिंगचा प्रयोग चर्चेत होता. त्यातूनच महंत सुधीरदास पुजारी यांनी उमेदवारी केली होती. त्यावेळी धार्मिकतेनुसार मतांचे विभाजन झाल्याचे दिसून आले होते.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news