नाशिक : पुढारी वृत्तसेवा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्तालयाने शस्त्र परवानाधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले आहे. आचारसंहिता लागू झाल्याने पोलिस ठाणेनिहाय परवानाधारक शस्त्रधारकांशी संपर्क केला जात आहे. निवडणूक झाल्यानंतर परवानाधारकांना शस्त्रे पुन्हा दिली जातील, असे आयुक्तालयाने सांगितले.
पोलिस आयुक्तालयातील विशेष शाखेंतर्गत कार्यरत शस्त्र परवाना विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची बैठक नुकतीच झाली. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व गुन्हे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी पथकाला शस्त्र परवानाधारकांशी संपर्क साधून त्यांच्याकडील शस्त्रे ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शस्त्र परवाना घेतलेल्या व्यक्तींशी संपर्क साधला जात आहे. नियमानुसार आचारसंहिता लागू झाल्यापासून परवानाधारक शस्त्रधारकांना त्यांच्याकडील शस्त्रे संबंधित पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागात जमा करावी लागणार आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही शस्त्रे पोलिसांच्याच ताब्यात राहतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस प्रशासन काही जणांचे शस्त्र परवाने रद्द करण्यासंदर्भात विचाराधीन आहे. यात ६५ हून अधिक वयोगटातील व शस्त्रांचा गैरवापर करणाऱ्यांचा समावेश आहे.
यांच्याकडे आहेत परवानाधारक शस्त्र
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात १ हजार ४०० जणांकडे परवानाधारक शस्त्रे आहेत. त्यापैकी ६० ते ७० टक्के हे सेवानिवृत्त पोलिस, सैन्य दलातील अधिकारी व कर्मचारी आहेत. तसेच इतरांमध्ये काही खेळाडू, अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, व्यापारी, उद्योजक, राजकीय व इतर क्षेत्रांतील व्यक्तींकडे परवानाधारक शस्त्रे आहेत.
हेही वाचा: