इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील वाडीव-हे येथे शुक्रवारी (दि. १०) महामार्गावर झालेल्या कुस्तीपटूच्या खून प्रकरणी वाडीव-हे पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून, मुख्य संशयितासह इतर अद्यापही फरार आहेत.
शुक्रवारी नाशिक-मुंबई महामार्गावर कुस्तीपटू भूषण लहामगे याचा काही अज्ञात मारेकऱ्यांनी गोळ्या झाडून खून केला होता. याबाबत भूषण याची पत्नी आदिती भूषण लहामगे यांनी वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, जमिनीच्या वाटणीवरून वाद असल्याने भूषण लहामगे याचा खून झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादिने सांगितल्यानुसार चुलत सासरे यशवंत लहामगे यांना ताब्यात घेतले असून, मुख्य संशयित वैभव यशवंत लहामगे आणि त्याचे इतर तीन ते चार अनोळखी साथीदार अद्याप फरार आहेत. पोलीस सर्व शक्यतांचा तपास करीत असून, संशयितांना पकडण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. मुख्य संशयितास अटक केल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याचा उलघडा होण्यास मदत होईल. या खून प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक यांनी भेट देत तपासकामी महत्त्वाच्या सूचना ग्रामीण पोलिसांना दिल्या होत्या. उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, वाडीव-हेच्या पोलिस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुनील बि-हाडे, राजू पाटील, पोलिस नाईक प्रवीण काकड पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा: