नाशिक : विद्यार्थिनींना नाचविल्याच्या प्रकारानंतर संतप्त आंदोलकांकडून ‘सर्वहारा’त तोडफोड

सर्वहारा परिवर्तन वसतिगृहात तोडफोड (छाया: हेमंत घोरपडे)
सर्वहारा परिवर्तन वसतिगृहात तोडफोड (छाया: हेमंत घोरपडे)
Published on
Updated on

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन विद्यार्थिनींना नाचविल्याच्या कथित प्रकारानंतर त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पहिणे गावाच्या चिखलवाडी येथील सर्वहारा परिवर्तन केंद्राचे वसतिगृह आणि शेजारील रिसाॅर्टवर बुधवारी (दि. 21) दिवसभर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करीत शाळेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. संबंधित रिसॉर्टचालकांविरोधात आंदोलक संतप्त झाल्याने तहसीलदारांनी ते रिसॉर्ट सील केले. या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात वाच्यता झाल्याने आदिवासी विकास विभागामार्फत समिती नेमण्याचे आदेश देण्यात आले.

वसतिगृहातील मुलींना बळजबरी नाचविल्याचा कथित प्रकार उघड झाल्यानंतर या ठिकाणी वातावरण तापले होते. दुपारच्या सुमारास येथे काही कार्यकर्त्यांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. यावेळेस काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर तातडीने पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला. दंगा रोखणारे पथक येथे तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. बुधवारी इगतपुरी-त्र्यंबकेश्वर प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. याबाबत त्र्यंबकेश्वर पोलिसांना सूचना दिल्या. आदिवासी विकास विभागामार्फत समीती नेमण्याचे आदेश दिले. त्र्यंबकेश्वरच्या तहसीलदार दिव्या संचेती यांनी जी 7 नेचर पार्क हे विनापरवानगी सुरू असलेले रिसॉर्ट सील केले.

दरम्यान, बुधवारी सकाळपासून येथे राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर तळ ठोकून होत्या. त्यांनी येथे असलेल्या 18 मुलींशी संवाद साधला. मुली भेदरलेल्या होत्या. भीतीने त्यांनी जेवणदेखील केलेले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, या मुलींच्या पालकांना बोलवून घेतले व त्यांच्या ताब्यात दिले. पालकांनी त्यांच्या सोयीप्रमाणे जवळच्या शाळेत आणि वसतिगृहात दाखल करण्याचे सांगण्यात आले आहे. आदिवासी विकास विभाग, समाजकल्याण विभाग यासह संबंधित शासकीय विभागांनी मुलींच्या शिक्षणात खंड पडणार नाही याची हमी घेतली आहे.

विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या प्रकरणी अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यामध्ये एल्गार कष्टकरी संघटना, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, महादेव कोळी समाज संघटना, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन यासह आणखी काही संघटनांची उपस्थिती होती. होस्टेलचे मालक, संबंधित शिक्षक यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. एल्गार संघटनेच्या मागणीनंतर मंगळवारी (दि. 20) पोलिसांनी तातडीने ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

आढळल्या आक्षेपार्ह गोष्टी

शाळा आणि होस्टेलच्या परिसरात दिवसभर झाडाझडती सुरू होती. यामध्ये काही आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत. यामध्ये मद्याच्या रिकाम्या बाटल्या, औषधे आणि सलाइन कशासाठी, असा सवाल येथे उपस्थित झाला आहे.

कोण खरे कोण खोटे?

तक्रार करणाऱ्या 5 मुली आणि होस्टेलवर असलेल्या 18 मुली अशा एकूण 23 मुली इयत्ता 8 वी आणि 9 वी मध्ये शिक्षण घेत आहेत. या मुलींना त्र्यंबकेश्वर येथील एमआरपीएच कन्या विद्यालयात दाखल केले असल्याची माहिती संस्थेतील कर्मचाऱ्यांनी दिली. मात्र, बुधवारी त्र्यंबकेश्वरच्या एमआरपीएच कन्या विद्यालय आणि त्याच इमारतीत असलेल्या नूतन त्र्यंबक विद्यालय या दोन्ही माध्यमिक शाळेत माहिती घेतली. त्या दोन्ही शाळांच्या मुख्याध्यापकांनी मुलींना फक्त विचारणा केली होती. मात्र, त्या आमच्या विद्यालयात दाखल नाहीत, असे सांगण्यात आले, तर त्याच वेळेस त्र्यंबक पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी होस्टेलवर भेट दिली असता मुली एमआरपीएच कन्या विद्यालयात शिक्षण घेतात, असे मुलींनीच सांगितल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news