

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बाेराळवाडी येथून बद्रीनाथ येथे देवदर्शनासाठी गेलेला एक भाविक बेपत्ता झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. त्यानंतर पोलिसांनीही त्यांचा शोध सुरु केला आहे.
बोराळवाडी येथील महादा जयाजी वाबळे (48) हे 10 मे रोजी बद्रीनाथ येथे जाण्यासाठी रेल्वेने निघाले होते. त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरून सतत संपर्क ठेवला होता.त्यानंतर प्रयागराज येथे असतांना त्यांचे कुटुंबियांशी अखेरचे बोलणे झाले. त्यानंतर त्यांचा संपर्कच झाला नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध सुरु केला. मात्र त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही.त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी 19 जून रोजी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात अर्ज देण्यात आला. त्यावरून पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद घेतली आहे.पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे, जमादार आकाश पंडीतकर पुढील तपास करीत आहेत.पोलिसांनी आता रेल्वेस्थानकावरील सीसीटव्हीफुटेजच्या माध्मयातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न चालविला आहे.