नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून दुपारी उकाडा आणि रात्री थंडी असा लहरी हवामानाचा सामना नाशिककरांना करावा लागत आहे. वातावरणातील या बदलामुळे शहरासह उपनगरातील महापालिकेची आरोग्य केंद्रे आणि जिल्हा शासकीय रुग्णालये हाउसफुल्ल झाल्याचे चित्र आहे. सर्दी-थंडी-तापाच्या रुग्णांसह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे खासगी डॉक्टरांचे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सकाळी आणि रात्री फुल्ल राहत आहेत.
फेब्रुवारी महिन्यातच ऑक्टोबर हिटसारखा उन्हाचा तडाखा नाशिककरांना सहन करावा लागत आहे. दुपारी कडाक्याचे ऊन व त्यामध्ये जाणवणारा गार वारा, तर सकाळी व रात्री कडाक्याची थंडी असे वातावरण शहरात आहे. वातावरणात झालेल्या या बदलामुळे बहुतांश नागरिकांना ताप, थंडी, सर्दी, खोकला, कसकस, डोकेदुखी अशा आजारांनी घेरले आहे. साथीच्या आजारांना हे वातावरण पूरक असल्याने नागरिकांमध्ये संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव जलद गतीने होण्याचा धोका वाढला आहे. बदलत्या हवामानाची झळ आबालवृद्धांना बसली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह विशेषत: बालकांची रुग्णालयात गर्दी वाढली आहे. बहुतांश नागरिक सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीने हैराण झाल्यानंतर डॉक्टरकडे न जाता मेडिकलमध्ये जाऊन गोळ्या अथवा औषध घेतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय थेट औषधे घेणे गंभीर बाब बनली आहे. दरम्यान, वातावरणात होणाऱ्या या बदलामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
रुग्णांच्या खिशाला कात्री…
सर्दी-ताप-थंडीच्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, शहरासह उपनगरांतील लहान-मोठ्या रुग्णालयांसह तपासणीसाठी आलेल्या रुग्णांना खबरदारी म्हणून रक्त, लघवीसह अन्य विविध प्रकारच्या वैद्यकीय चाचण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे. डॉक्टरांचा डेंग्यूसह स्वाइन फ्लूच्या चाचणीवर भर आहे. वैद्यकीय चाचण्यासाठी तीनशे ते हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याने रुग्णांच्या खिशाला कात्री लागत आहे.