नाशिक : यंदा द्राक्षांना अवकाळीचा मोठा फटका

द्राक्ष पिकांना फटका www.pudhari.news
द्राक्ष पिकांना फटका www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या 37 वर्षांत झाला नाही एवढा अवकाळी पाऊस गारपिटीसह यंदाच्या हंगामात झाल्याने जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले आहेत. कृषी विभागाच्या नुकसानीच्या प्राथमिक अहवालानुसार, 1,295 हेक्टर क्षेत्रावरील बागा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यामध्ये एकरी सरासरी 5 लाखांचे नुकसान झालेले असून, 161 कोटींवर द्राक्षमाल मातीमोल झाल्याने द्राक्षपंढरी उद्ध्वस्त झाल्याची भीषण परिस्थिती शेतकर्‍यांनी सांगितली. गेल्या वर्षीही अवकाळी पाऊस होता, तेव्हा 90 ते 100 कोटींचा द्राक्षमाल खराब झाल्याचे चित्र होते. तेव्हाही 1,178 हेक्टर क्षेत्रावरील बागा उद्ध्वस्त झाल्या होत्या.

यंदाचा हंगाम सुरू झाला, तेव्हा अतिशय चांगला होता. यावेळी शेतीपीकही व्यवस्थित झाले होते. मात्र, जेव्हा काढणीची वेळ आली, तेव्हा मात्र अवकाळी पाऊस सुरू झाल्याने निर्यातक्षम द्राक्षाला भेगा पडल्याने तो स्थानिक बाजारात विकावा लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने निघून गेल्याने भविष्यात द्राक्षपीक घ्यायचे की नाही, याबाबत शेतकरी विचार करत आहेत. 2016 पर्यंत द्राक्षपीक घेणार्‍यांसाठी सुगीचे दिवस होते. 2017 पासून याला उतरती कळा लागली आहे. खर्च आहे तसाच आहे. मात्र, उत्पन्नाचे प्रमाण घटत आहे. उत्कृष्ट निर्यातक्षम द्राक्षासाठी प्रतिएकर अडीच ते तीन लाख रुपये खर्च होत आहे. उत्पन्नाचा विचार करता प्रतिएकर प्लॉटमधून अवघे दीड ते दोन लाख रुपये मिळत आहेत.

अस्मानी आणि सुलतानी संकट एकाच वेळी आल्याने बळीराजा हवालदील झाला आहे. उभा बाग पाडून टाकण्याची वेळ आली, एवढी बिकट अवस्था द्राक्ष उत्पादक शेतकर्‍यांची झाली आहे. – अमोल काळे, द्राक्ष बागायतदार.

गेल्या वर्षी जिल्ह्यात निर्यातक्षम मालाला 50 ते 70 रुपये प्रतिकिलो एवढा भाव, तर लोकल बाजारात 20 ते 27 रुपये प्रतिकिलो एवढा भाव मिळत होता. यंदा मात्र त्यात घट होऊन निर्यातक्षम मालाला 40 ते 60 रुपये, तर लोकल बाजारात 10 ते 17 रुपये भाव मिळत असल्याचे शेतकरी सांगतात. जिल्ह्यातून गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 हजार 952 मे.टन जास्त द्राक्ष निर्यात झाले आहे. गेल्या वर्षी 1 लाख 22 हजार 329 मे.टन, तर यंदा 1 लाख 43 हजार 281 मे.टन निर्यात झाली आहे. त्यापैकी युरोपीयन देशांमध्ये 93 हजार 579 गेल्या वर्षी, तर यंदा त्यामध्ये लक्षणीय वाढ होत 1 लाख 5 हजार 300 मे.टन द्राक्षे निर्यात झाली आहेत. बिगरयुरोपीयन देशांचा विचार करता, गेल्या वर्षी 28 हजार 750, तर यंदा 37 हजार 981 मे.टन द्राक्षांची निर्यात झाली आहे.

यंदा हंगाम व्यवस्थित सुरू झाला होता. ऐन द्राक्ष काढणीच्या वेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसला. सलग पाच वर्षांपासून ही परिस्थिती असल्याने आता शेतात द्राक्षाला पर्यायी उत्पादनाचा विचार आम्ही करतो आहे. – विलास पाटील, द्राक्ष बागायतदार.

हेही वाचा:

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news